रामदास आठवले : विद्यापीठात विद्यार्थी परिसंवादअमरावती : संत गाडगेबाबा विद्यापीठातील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागासलेले असल्याने त्यांची गैरसोय होते. गैरसोय दूर करण्यासाठी दिल्ली येथील बाबा जगजीवन राम फाऊंडेशनच्यावतीने एक वसतिगृह व डॉ.बाबासाहेब आंबेडकर फाऊंडेशनच्यावतीने अमरावतीत डॉ. आंबेडकर फोटो गॅलरी उभारणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी केले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ना. आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थी परिसंवाद कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे, आ.सुनील देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. माजी आ. अनिल गोंडाणे, विद्यार्थी कल्याण संचालक गणेश मालटे, कुलसचिव अजय देशमुख उपस्थित होते. गरिबांना शिक्षणाची सोय, १० लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्या सर्व गरिबांना आरक्षण मिळावे, असे ते म्हणाले. दलितांच्या संरक्षणासाठी अॅट्रॉसिटी कायदा निर्माण झाला आहे तो रद्द होऊ शकत नाही. याचा गैरवापर होऊ नये म्हणून कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात. रासेयोच्या विद्यार्थ्यांनी गावागावांत जाऊन गाव, राज्य, देश एक आहेत हा प्रचार केला पाहिजे, अंतरजातीय विवाहासाठी प्रत्येक जोडप्यास ५ लाख रुपये मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले. देशात समता प्रस्थापित करण्यासाठी भारतीय संविधानानुसार भारत उभा राहिला पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आपणही कष्ट घ्यावेत, असे सांगून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचा गौरव केला. पालकमंत्र्यांनी ना. आठवलेंच्या कार्यशैलीचा गौरव करुन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गरज भागविण्यासाठी केंद्राच्या निधीतून जिल्हा व तालुकास्तरावर ३ ते ४ वसतिगृहे सुरु करावीत, अशी मागणी केली. आ. सुनील देशमुख म्हणाले ना.रामदास आठवले हे अत्यंत प्रतिकूल संघषार्तून केंद्र शासनातील पद हस्तगत केले.विद्यार्थ्यांशी साधला संवाद ना. रामदास आठवले यांनी विद्यापिठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना मिळत असलेली शिष्यवृत्तीची रक्कम, वसतिगृहातील भरती प्रक्रिया, राष्ट्रीय सेवा योजना, कौशल्य विकासाचे उपक्रम आदींबाबत विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. सर्व प्रश्नांना ना. आठवले यांनी समर्पक उत्तरे दिलीत. भाषणाच्या सुरुवातीस त्यांनी उपस्थितांपुढे ‘जेव्हा केल्या होत्या मी अनेक सभा, तेव्हा आठवले मला गाडगेबाबा, मी जरी असलो सध्या वरचा तरी मी आहे तुमच्या घरचा.जेव्हा मी होतो विद्यार्थी तेव्हा होतो भिमाच्या रथाचा सारथी. माणूस म्हणून जगा, देऊ नका कोणाला दगा’अशा कविता सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली. प्रशांत रोकडे (आयआरएस) यांचा सत्कार ना. रामदास आठवले यांचे स्वीय सहायक प्रशांत रोकडे हे अमरावती विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यांना आयआरएस (इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस) मिळाल्याबद्दल त्यांचा पालकमंत्री प्रवीण पोटे व कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
अमरावतीत वसतिगृह, फोटो गॅलरी उभारणार
By admin | Updated: October 11, 2016 00:23 IST