टाकरखेडा संभू : सर्वसामान्य व गरीब कुटुंबांतील रुग्णांना अत्यावश्यक सेवा म्हणून शासनाकडून आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णवाहिकेची सुविधा केली आहे. परंतु, ही रुग्णवाहिका नावापुरतीच असून, प्रत्यक्षात या रुग्णवाहिकेने कित्येकदा रुग्णांना दगा दिल्याची प्रचिती भातकुली तालुक्यात रुग्णांना आलेली आहे.
तालुक्यातील गणोरी आरोग्य केंद्र वगळता वाठोडा शुक्लेश्वर, आष्टी व खोलापूर या तीनही आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या रुग्णवाहिका भंगार झालेल्या आहेत. या रुग्णवाहिकेला १८ ते २० वर्षे पूर्ण झाली असतानाही आजपर्यंत कित्येकदा पाठपुरावा करूनही नवीन रुग्णवाहिका न मिळाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, हा मतदारसंघ पालकमंत्र्यांचा आहे.
भातकुली तालुक्यात आष्टी, खोलापूर व गणोरी ही तीन प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या अंतर्गत ४५ ते ५० गावांना आरोग्य सेवा पुरविली जाते. सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या भातकुली तालुक्यात मात्र इमर्जन्सी सेवा असलेल्या रुग्णवाहिका भंगार असल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. बडनेरा मतदार संघात असलेल्या गणोरी येथे २०१२ मध्ये नवीन रुग्णवाहिका मिळाली. परंतु, तिवसा मतदारसंघातील समाविष्ट आष्टी, खोलापूर व वाठोडा शुक्लेश्वर येथे असलेल्या तीनही रुग्णवाहिकांनी अठरा ते वीस वर्षांचा पल्ला गाठलेला आहे. आष्टी येथील रुग्णवाहिका कित्येकदा बंद पडल्याने रुग्णांना ऐनवेळी खासगी वाहनाने अमरावतीला न्यावे लागले आहे. याबाबत तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र दाळू व त्यानंतर वैद्यकीय अधिकारी निखिल उप्पलवार यांनी आरोग्य विभागाला नवीन वाहनाची मागणी केली होती.
बॉक्स
नवीन रुग्णवाहिकेतून भातकुली तालुक्याला वगळले
पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्ह्याला १२ रुग्णवाहिका मिळाल्या. परंतु, त्यांचाच मतदारसंघ वगळण्यात आला. स्थानिक लोकप्रतिनिधी रुग्णवाहिकेची मागणी करीत नाहीत का, असाही प्रश्न या माध्यमातून उपस्थित केला जात आहे.
बॉक्स
तीन आरोग्य केंद्रांतील रुग्णवाहिकांना पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. नवीन रुग्णवाहिका देण्याबाबत आम्ही आरोग्य विभागाला पत्रव्यवहार केला आहे. आष्टी येथील रुग्णवाहिका एक-दोनदा मध्येच बंद पडल्याचा अनुभव आला.
- डॉ अक्षय निकोसे, तालुका वैद्यकीय अधिकारी, भातकुली