मोर्शी : अप्पर वर्धा धरणाच्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्यातील पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसामुळे मंगळवार संध्याकाळनंतर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा वाढल्यामुळे ५ आॅगस्टच्या सकाळी १० वाजता धरणाची संपूर्ण तेराही दारे उघडण्यात आली. धरणासमोरील पूलावरुन कित्येक फूट पाणी वाहात असल्यामुळे आष्टी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. अप्पर वर्धा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पावसाची झड लागली आहे. (सविस्तर वृत्त/३) बुधवारी सकाळी ८ वाजता पर्यंतच्या २४ तासात पाणलोट क्षेत्रातील महाराष्ट् आणि मध्य प्रदेश क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात १०० मिमीपेक्षा जास्त पाउस पडला. धरणाला येवून मिळणाऱ्या माडू, वर्धा आणि जाम नदीला पूर आल्यामुळे धरणातील पाण्याचा येवा वाढीस लागला. अप्पर वर्धा धरणात ३१ आॅगस्टपर्यंत ३४२.२ मिटर जलपातळी ठेवण्याचे नियोजन आहे. मंगळवारी दुपारी ही पातळी ३३९.४३ मीटर एवढी होती. एकूणच आॅगस्ट महिन्याची निर्धारित जलपातळी गाठण्याकरिता फार दिवस वाट पाहावी लागेल, असे मंगळवारचे चित्र असताना मात्र ५ आॅगस्टला सकाळी ५१७७ घनमीटर प्रतिसेकंद एवढा पाणी साठा वाढला आणि धरणाची पातळी ३४१.६५ मीटर एवढी झाली. आॅगस्ट महिना संपण्यास अजून वेळ असल्यामुळे शिवाय उर्वरित दिवसात आणखी पाउस येण्याची शक्यता पाहता, अप्पर वर्धा धरणाच्या अधिकाऱ्यांनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. सकाळी ९.३० पासून आष्टी मार्ग बंद करण्यात आला आणि त्या नंतर १० वाजता धरणाचे संपूर्ण १३ ही दारे ५० सेंमीने उघडण्यात आले. यावेळी १०१५ घनमीटर प्रतिसेकंद एवढा विसर्ग सुरु करण्यात आला. तथापि, पाण्याची पातळी वाढत असल्याचे पाहून सकाळी ११ वाजता १ मीटरने तर दुपारी १२ वाजता दीड मीटरने धरणाची दारे उघडण्यात आली. सध्या २८१७ घनमिटर प्रतिसेकंद एवढा पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सकाळी १० वाजता ५१७७ घनमीटर एवढा पाण्याचा येवा होता तो ११ वाजता ४५२७ आणि दूपारी १२ वाजता ४५२७ तर १ वाजता ३९७८ घनमीटर प्रतीसेकंद एवढा कमी होत गेला. सद्यस्थितीत तरी गुरुवारपर्यंत संपूर्ण तेराही दारे उघडी राहण्याची शक्यता आहे. धरणस्थळी अधीक्षक अभियंता र. प. लांडे, कार्यकारी अभियंता स. ना .लढ्ढा यांनी भेट देऊन माहिती प्राप्त करुन घेतली. उपविभागीय अभियंता एम. के. काळमेघ, शाखा अभियंता सुधाकर राउत, स्थापत्य अभियंता सहायक साने, यांत्रीकी विभागातील विजय मेश्राम आणि इतर कर्मचारी धरणस्थळी ठाण मांडून बसले आहे. (तालुका प्रतिनिधी)
अप्पर वर्धाचे सर्व १३ दरवाजे उघडले
By admin | Updated: August 6, 2015 01:23 IST