धामणगाव रेल्वे : चांदूर रेल्वे उपविभागातील ३६१ गावांच्या वेशीवरच कोरोना रोखण्यासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. या गावातील कोरोना समित्या पुन्हा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, तलाठी, ग्रामसेवक यांनी मुख्यालयी न राहिल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश चांदूर रेल्वेचे उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांनी दिले आहेत.
धामणगाव, नांदगाव खंडेश्वर, चांदूर रेल्वे या तालुक्यांत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. धामणगाव शहर, जुना धामणगाव तसेच तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर, आसेगाव, तळणी येथे नव्या रुग्णांची नोंद होत आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात रोहणा, शिवणी, मंगरूळ चव्हाळा यासह चांदूर रेल्वे शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. चांदूर रेल्वे उपविभागात ३६१ गावे येतात. या गावांमध्ये सरपंच, उपसरपंच, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापकांसह ग्रामपंचायत सदस्य यांची कोरोना निर्मूलन समिती तयार करून प्रत्येक प्रभाग व गावात ही समिती कार्यान्वित करण्यात येण्याच्या सूचना इब्राहिम चौधरी यांनी दिल्या आहेत.
बाहेरगावाहून येणाऱ्यांवर कटाक्ष
बाहेरून गावात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद ग्रामपंचायतने करावी तसेच गावात स्वच्छता राखण्यासाठी नेमलेल्या समन्वय समितीने पुढाकार घ्यावा. शनिवार व रविवारी शासनाच्या नियमाप्रमाणे लॉकडाऊन पाळण्यात यावे. एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक व्यक्ती दिसता कामा नये. संबंधित व्यक्तीला मास्क लावणे अनिवार्य करण्याचे आदेशही चौधरी यांनी दिले आहे.
-----------