अमरावती : रेल्वे बोर्डाने लांब पल्ल्याच्या काही गाड्यांचे जनरल डबे वातानुकूलित करण्याचा निर्णय घेतला आहे. यात प्रामुख्यांने हावडा-मुंबई, पुणे- हावडा, हावडा- अहमदाबाद, पुणे- नागपूर या दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांचे जनरल डबे येणाऱ्या काळात गारेगार होतील. मात्र, तिकीट महागडे होऊन प्रवाशांच्या खिशाला चाट बसणार आहे.
रेल्वेने सामान्य प्रवाशांना देखील जनरल डब्यातून वातानुकूलित प्रवास करता यावा, यासाठी सर्व सुविधांयुक्त अशा ईकॉनॉमी थ्री टियर डब्यांची निर्मिती केली. आता हे जनरल डबे सुद्धा वातानुकूलित केले जाणार आहे. जनरल डब्यांना वातानुकूलित करण्यासाठी चार ते पाच महिन्यात कपुरथळा येथील कोच फॅक्टरीत डब्यांचे प्राेटोटाईप तयार करण्यात येणार आहे. त्यास वरिष्ठांकडून मंजुरी मिळताच डबे निर्मितीला प्रारंभ होईल, अशी माहिती एका रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये जनरल डब्यात हा प्रयोग राबविला जाणार आहे. जनरल आणि आरक्षित डबे असा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी डब्यांची रचना बदलविली जाणार आहे. काही एक्स्प्रेस, सुपरफास्ट गाड्यांचा वेग वाढविणार असून, ताशी १३० किमी वेगाने त्या धावतील, असा बदल होणार आहे. स्लीपर आणि जनरल डब्यांच्या खिडक्या सुरू असल्याने त्या वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी मारक ठरतात. अशा डब्यांमध्ये वातानुकूलित सुविधा पुरविणे शक्य नाही. त्याकरिता डब्यांमध्ये बदल केला जाणार आहे. सामान्य डबे हटवून त्याजागी वातानुकूलित डबे येणार आहे.
--------------
अमरावती- मुंबई एक्स्प्रेसमध्ये ४ मार्च रोजी एक जनरल डब्यांऐवजी वातानुकूलित डबा जोडण्यात आला होता. आता ९ मार्च रोजी मुंबईकडे जाणाऱ्या गाडीत एक डबा एसी लागणार आहे. हा निर्णय केवळ राज्य विधिमंडळाचे अधिवेशनापुरता आहे. मात्र, नियमित एक्स्प्रेस, सुपर फास्ट गाड्यांचे जनरल डबे वातानुकूलित करण्याबाबत तूर्त पत्र प्राप्त झाले नाही. तसे काही आदेश आल्यास अंमलबजावणी केली जाईल.
- महेंद्र लोहकरे, प्रबंधक, अमरावती रेल्वे स्थानक