लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विमानतळाहून येथील बेलोरा सप्टेंबरपासून विमानसेवेला प्रारंभ झाला आहे. एअर अलायन्सच्या संकेत स्थळावर १ आणि ५ सप्टेंबर रोजी मुंबई-अमरावती-मुंबई या विमानसेवेचे बुकिंग सुरू झाले आहे. गत १० दिवसांपूर्वी विमानात तांत्रिक बिघाड आल्याच्या कारणावरून अमरावती-मुंबई विमानसेवा तूर्तास बंद करण्यात आली होती. मात्र, विमानाचा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला असून आजपासून एअर अलायन्सची अमरावती-मुंबई सेवा सुरू होत आहे.
केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेंतर्गत अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार अशी ही विमानसेवा आहे. बेलोरा विमानतळाहून १६ एप्रिल २०२५ रोजी एअर अलायन्सचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान होपावले होते. मात्र, २१ ऑगस्टपासून अमरावती-मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा बंद करण्याचा निर्णय झाला होता. एअर अलायन्सचे हे विमान मुंबई विमानतळावर 'स्टे' होते. दरम्यान, विमानात तांत्रिक बिघाडाची दुरुस्ती युद्धस्तरावर करण्यात आली. 'ऑपरेशन इश्यू'च्या नावाखाली विमानसेवा तूर्तास थांबली होती. आता एअर अलायन्सने विमानाच्या फेऱ्यांचे शेडयूल्ड जाहीर केले आहे. त्यानुसार १ सप्टेंबरपासून मुंबई ते अमरावती विमानफेरी सुरू होईल.
४५ ते ५० प्रवाशांचे बूकिंगएअर अलायन्स विमानाने अमरावती ते मुंबईकडे सोमवार, १ सप्टेंबर रोजी जाण्यासाठी ४५ ते ५० प्रवाशांचे बूकिंग झाल्याचे संकेत स्थळावर दिसून आले. अमरावती-मुंबई ही ७२ एटीआर ही विमानसेवा असून ३५०० ते ४००० यादरम्यान प्रवासी तिकीट दर आकारले जात असल्याची माहिती विमानतळाचे प्रबंधक राजकुमार पटेल यांनी दिली.