लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत सुरू झालेली अमरावती ते मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा तूर्तास बंद झाली आहे. विमानात तांत्रिक बिघाड आल्यामुळे अमरावतीसह हैदराबादचीही विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती आहे. १ किंवा १५ सप्टेंबर २०२५ पासून एअर अलायन्स सेवा सुरू होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.
अमरावती विमानतळाहून १६ एप्रिल २०२५ रोजी एअर अलायन्सचे मुंबईकडे पहिले प्रवासी विमान झेपावले होते. सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून तीन दिवस मुंबई-अमरावती- मुंबई ही विमानसेवा सुरू आहे. मध्यंतरी वातावरण खराब झाल्यामुळे अमरावती ते मुंबईदरम्यान काही विमानफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. मात्र, २१ ऑगस्टपासून अमरावती-मुंबई एअर अलायन्सची विमानसेवा बंद झाली आहे.
एअर अलायन्सच्या विमानात तांत्रिक बिघाडाची युद्धस्तरावर दुरुस्ती सुरू आहे. एअर अलायन्सचे हैदराबाद ते मुंबई ही विमानसेवा तूर्तास रद्द करण्यात आली आहे. मात्र, २१ ऑगस्टपासून विमानप्रवास करणाऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. 'ऑपरेशन इश्श्यू'च्या नावाखाली विमानसेवा थांबली असली तरी एअर अलायन्सच्या विमानात मोठा बिघाड झाल्याची माहिती आहे. मुंबई ते अमरावती, मुंबई ते हैदराबाद या विमानफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. या संदर्भात अमरावतीच्या विमानतळ अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता 'नो कॉमेंट्स' असे उत्तर मिळाले, हे विशेष.
मुंबईकडे ५० ते ६० प्रवाशांचे बुकिंगएअर अलायन्स विमानाने अमरावती ते मुंबईकडे ये-जा करणाऱ्यांची संख्या ५० ते ६० एवढी असते. साधारणतः विमान बुकिंगची अशीच आकडेवारी आहे. त्यामुळे मुंबई-अमरावती विमानसेवा सुरळीत सुरू असल्याचे चित्र आहे. ७२ एटीआर ही विमानसेवा असून ३५०० ते ४००० यादरम्यान प्रतिप्रवासी तिकीट दर आकारले जाते. मात्र, विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे १० दिवस विमानसेवेला ब्रेक लागणार आहे.
"मुंबई-अमरावती-मुंबई ही एअर अलायन्सची विमानसेवा सुरळीत व्हावी, यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापु राममोहन नायडू यांना २८ ऑगस्ट रोजी पत्रवजा मेल पाठविला आहे. हे एकच विमान आठवड्यातून तीन फेऱ्या करते. त्यामुळे या हवाईमार्गावर सुसज्ज आणि नवीन विमान मिळावे, अशी मागणी केली आहे."- बळवंत वानखडे, खासदार, अमरावती