अमरावती : रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेले कृषिक ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी याचा वापर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे यांनी केले आहे.
कृषिविज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारस केलेल्या मात्रा मिळण्यासाठी कृषिक या मोबाईलचा ॲपचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. रासायनिक खताचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादनखर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकासाठी अचूक व फायदेशीर खतमात्रा निवडणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढीस लागून अधिक उत्पन्न आपल्या हाती येईल. ही अचूक खतमात्रा मिळविण्यासाठी फार क्लिष्ट गणिती सूत्रांचा वापर करावा लागतो. त्यामुळे शेतकरी मित्रांना या खतमात्रा अगदी सहज, सुलभ पद्धतीने कशा मिळविता येतील, हे लक्षात घेऊन खत गणकयंत्र विकसित करण्यात आले आहे. या गणकयंत्रामध्ये संबंधित कृषी विद्यापीठाच्या पीकनिहाय खत शिफारशींचा समावेश, जमीन, आरोग्यपत्रिका आधारित विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा, बाजारातील किमतीनुसार प्रतिएकर आवश्यक खत्रमात्रांच्या खर्चाची गणना, पिकांसाठी शिफारस केलेल्या खतमात्रेचे नत्र, स्फुरद व पालाश वापरासाठी विविध पर्याय, शिफारस केलेल्या खतांच्या विभाजित (स्प्लिट) मात्रांची गणना, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशींचे पर्याय उपलब्ध, गावनिहाय जमीन, सुपीकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना आदी राहणार आहे.
बॉक्स
ॲप वापरा अन् भरघोस उत्पन्न मिळवा
आपण कृषी गणकयंत्राच्या माध्यमातून संबंधित कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा परिगणित करण्यासाठी या मोबाईल ॲपचा वापर करावा. त्याप्रमाणे खतांच्या फायदेशीर पर्याय (संयोजन) निवडून भरघोस उत्पन्न मिळवा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.