खत गणकयंत्र, शेतकरी बांधवांना वापर करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
अमरावती : रासायनिक खतांचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने कृषी विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेले ‘कृषिक‘ ॲप शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी याचा वापर करावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी प्रीती रोडगे यांनी केले आहे.
कृषी विज्ञान केंद्र व महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित रासायनिक खताच्या शिफारसी केलेल्या मात्रा मिळविण्यासाठी कृषिक या मोबाईल ॲपचा वापर शेतकऱ्यांना करता येणार आहे. रासायनिक खताचा कमीत कमी व संतुलित वापर होण्याच्या दृष्टीने तसेच उत्पादन खर्च कमी करून अधिक उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने प्रत्येक पिकासाठी अचूक व फायदेशीर खतमात्रा निवडणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढून अधिक उत्पन्न आपल्या हाती येईल. ही अचूक खतमात्रा मिळविण्यासाठी फार क्लिष्ट गणिती सूत्रांचा वापर करावा लागतो. यासाठी शेतकरी मित्रांना या खतमात्रा अगदी सहज सुलभ पद्धतीने कशा मिळविता येतील, हे लक्षात घेऊन कृषिक ॲपच्या माध्यमातून खत गणकयंत्र विकसित करण्यात आले आहे. या खतगणक यंत्रामध्ये संबंधित कृषी विद्यापीठाच्या पीकनिहाय खत शिफारशीचा समावेश, जमीन, आरोग्य पत्रिका आधारित विविध पिकांसाठी शिफारस केलेली खतमात्रा, बाजारातील किमतीनुसार एकरी आवश्यक खत्रमात्रांच्या खर्चाची गणना, पिकांसाठी शिफारस केलेल्या नत्र, स्फुरद व पालाश वापरासाठी विविध खतांचा पर्याय, शिफारस केलेल्या खतांच्या विभाजित (स्प्लिट) मात्रांची गणना, सरळ व संयुक्त खतांच्या शिफारशीचे पर्याय उपलब्ध, गावनिहाय जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खतमात्रांची परिगणना आदी राहणार आहे.
बॉक्स
भरघोस उत्पादनासाठी वापरा ॲप
खत गणकयंत्राच्या माध्यमातून संबंधित कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांसाठीच्या खतमात्रा परिगणित करण्यासाठी कृषिक मोबाईल अॅपचा वापर करावा. खतांच्या फायदेशीर पर्याय (संयोजन) निवडावा आणि भरघोस उत्पन्न मिळवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.