महापालिकेत बैठक : आता बाहेरचे कंत्राटदार करणार विकासकामेअमरावती : महापालिका रेकॉर्डवर नोंदणीकृत कंत्राटदारांनी विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रियेत सहभागी न होण्याची भूमिका घेतल्याने आयुक्तांनी बाहेरील कंत्राटदारांना शहरात विकासकामे करण्यासाठी आंमत्रित केले आहे. त्याअनुषंगाने सोमवारी संबंधित कंत्राटदारांची बैठक पार पडली. निविदा प्रक्रियेतून स्पर्धा करुन विकासकामे करा, देयके त्वरित मिळतील. देयके मिळण्यास उशीर झाल्यास एक टक्के व्याज देऊ, असा विश्वास आयुक्तांनी कंत्राटदारांना दिला.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या अध्यक्षतेखाली कंत्राटदारांची बैठक पार पडली. यावेळी उपायुक्त विनायक औगड, कार्यकारी अभियंता अनंत पोतदार, प्रभारी शहर अभियंता जीवन सदार, प्रकाश विभागाचे उपअभियंता अशोक देशमुख यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम, सिंचन, जिल्हा परिषद, लघु सिंचन प्रक ल्पाचे कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना, मजूर सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त गुडेवार यांनी महापालिकेतील निविदा प्रक्रिया, कामांची यादी वाचून दाखविली. ४३ प्रभागनिहाय मेंटनन्सची १० लाखांची तर वार्ड विकास निधीतून ४० लाखांची कामे मिळतील, असे ते म्हणाले. बाहेरील कंत्राटदारांना कामाची पध्दत समजावून सांगताना आयुक्तांनी थातुरमातूर कामे चालवून घेणार नाही, अशी तंबी देखील दिली. बांधकाम साहित्याचे वाढते दर लक्षात घेता ई-निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी कमी दरात कामे घेण्याची घाई करु नये. कामांच्या दर्जाबाबत तडजोड करणार नाही, असे देखील आयुक्तांनी स्पष्ट केले. कंत्राटदारांवर लागलेला ‘चोर’ हा शिक्का पुसून काढण्याची ही नामी संधी असून कंत्राटदारांनी या संधीचे सोने करावे, असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. दर्जेदार कामे करा, बिलासाठी कोणाच्याही पुढे लाचार होऊ नका, असे म्हणत आयुक्तांनी बाहेरील कंत्राटदारांमध्ये ऊर्जा निर्माण केली. कामे घेताना शिफारस अथवा वशीलेबाजी चालणार नाही. ई- निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन चांगले कामे करा, सहकार्य मिळेल, अशी ग्वाही आयुक्त गुडेवार यांनी दिली. दरम्यान कंत्राटदारांची गाऱ्हाणी, समस्या ऐकून घेण्यात आल्या. या बैठकीत संदेश खडसे, विशाल काळे, सोनल गुप्ता, हर्षल कावरे, स्वराज्य ठाकरे, आनंद देशमुख, विजय खंडेलवाल, मिश्रा, कडू, एस. एम.खत्री, पी.डी.गावंडे, सय्यद वसीम, बी.के. शेख, आर. एस. बत्रा, आतिश मालाणी आदी कंत्राटदार उपस्थित होते. कंत्राटदारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. (प्रतिनिधी)स्थानिक कंत्राटदारांनी असहकार्याची भावना सुरु केली. हे सर्व कशासाठी आहे, याची जाणीव मला आहे. परंतु शहरात विकासकामे व्हावीत, यासाठी बाहेरील कंत्राटदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. ४० ते ५० कंत्राटदार बैठकीत सहभागी झाले होते. ई-निविदा प्रक्रियेतून ही कामे दिली जातील.- चंद्रकांत गुडेवार,आयुक्त, महापालिका.
अखेर नोंदणीकृत कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत
By admin | Updated: July 7, 2015 00:05 IST