वीज वितरण कंपनीची कसरत : नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वासआसेगाव (पूर्णा) : वीज कंपनीच्या वीज वाहिनीवरील तांब्याची तार एकाच रात्रीतून चोरून नेल्याने ८० गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज कंपनीने शर्तीचे प्रयत्न करून अल्पावधीत वीजपुरवठा सुरळीत केल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. आसेगाव वीज उपकेंद्राला अमरावती आणि अचलपूर या दोन ठिकाणावरून वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रावरून आसेगाव गावठान व कृषी तसेच सावळापूर, वासनी, कोटगावंडी व चांदूरबाजार या सहा फिडरवरून भातकुली, चांदूरबाजार, अचलपूर व दर्यापूर या चार तालुक्यांतील ८० गावांना गावठान व कृषिपंपांना वीज पुरविली जाते. काही दिवसांपूर्वी मक्रमपूर ते आष्टीदरम्यान अमरावती ते आसेगाव या ३३ के. व्ही. वीज वाहिनीवरील तार चोरट्यांनी लंपास केल्याने अमरावतीकडून येणारा वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे आसेगाव उपकेंद्राला एकमेव अचलपूर येथूनच वीजपुरवठा होत होता.पण अचलपूर ते आसेगाव या वीज वाहिनीवरील टाकरखेडा पूर्णा ते वासनी-मेघनाथपूरदरम्यान तीन कि. मी. लांबीची व सुमारे पाच लाख रूपये किमतीची तांब्याची तार बुधवारी रात्री चोरट्यांनी चोरून नेली. त्यामुळे ८० गावे अंधारात होती. नागरिकांना उकाड्याचा आणि डासांचा सामना करावा लागला. सिंचन, पिठगिरण्या, विजेवरील उपकरणे तसेच बँका आणि एटीएमचे कार्य दोन दिवस बंद राहिले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावतीचे अधीक्षक अभियंता दिलीप भुगूल यांच्या मार्गदर्शनात अचलपूरचे उपकार्यकारी अभियंता टेंभेकर, सहायक अभियंता अजरुद्दीन, आसेगावचे कनिष्ठ अभियंता ठाकरे व त्यांचा सर्व कर्मचारी वर्ग तसेच कंत्राटदार जलील आणि त्यांच्या ५० माणसांनी युद्धस्तरावर परिश्रम घेऊन अल्पावधित वीजपुरवठा सुरू केला आणि ४२ तासांनंतर ८० गावांतील जनतेला दिलासा मिळाला. (वार्ताहर)
४२ तासांनंतर ८० गावांचा वीजपुरवठा सुरळीत
By admin | Updated: July 8, 2015 00:24 IST