शेकडो शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली, जमीन पडीक राहण्याची शक्यता
चांदूर रेल्वे : तालुक्यातील सोनगाव शिवणी धरण प्रकल्प यंदा १०० टक्के भरल्याने सोनगाव शिवणी व पळसखेड शिवाराकडे जाणारा वहिवटीचा रस्ता पाण्याखाली आला आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांची शेतीची कामे खोळंबली आहेत. शेती पडीक पडण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. वहिवटीचा रस्ता व पूल त्वरित तयार करण्यात यावा, अशी मागणी सोनगाव-शिवणी व पळसखेड शिवारातील शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
चांदूर रेल्वे तालुक्यातील सोनगाव शिवणी धरण प्रकल्प आहे.या प्रकल्पाजवळ सोनगाव-शिवणी व पळसखेड शिवारात हजारो हेक्टर शेती आहे. गतवर्षी धरण पूर्ण भरले नव्हते. मात्र, यंदा पाऊस जास्त झाल्याने सोनगाव शिवणी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांचा नेहमीचा वहिवटीचा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे. शेतकऱ्यांना वाहीपेरी करता येत नाही. पर्यायी व्यवस्था म्हणून ओव्हर फ्लोमधून शेतकरी जात होते. आता तोही रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी पुलाची आवश्यकता आहे. ही समस्या शेतकऱ्यांनी ऊर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्प, अमरावती यांच्याकडे बरेचदा अर्ज देऊन मांडली. त्यांनी पाहणी केली; परंतु त्यांनी काम केले नाही.
प्रकल्पालगतच्या शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित नुकसानभरपाई देण्यात यावी तसेच सोनगाव शिवणी व पळसखेड शिवारातील वहिवटीचा रस्ता व पूल त्वरित तयार करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आमदार प्रताप अडसड, जिल्हाधिकारी, चांदूर रेल्वेचे तहसीलदार, कार्यकारी अभियंता यांनाही निवदेन देण्यात आले. याप्रसंगी रोशन सरदार, राजेश डहाके, दीपक राऊत, श्रीकृष्ण राऊत, अनिल मेटे, सचिन कांबळे, अक्षय भेंडे, धीरज गडलिंग, संतोष सोळंके, अतुल सोळंके, अजय काळमेघ, दिलीप वानखडे, साहेबराव राऊत, वैभव राऊत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.