अमरावती : रस्त्यावर भीक मागण्यास मुलांना कुणी प्रवृत्त करीत असेल तर त्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी दिले. तसेच त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यासंदर्भात चर्चा केली. संबंधित घटकाला त्या अनुषंगाने नियोजन करून उपायोजना करण्याच्या सूचनाही यावेेळी सीपींनी दिल्या. पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात बुधवारी आयुक्तालयात बैठक घेतली.
मुस्कान ऑपरेशन ०९ प्रभावीपणे राबविण्याकरिता सदर बैठक घेण्यात आली. यात जिल्हा व महिला बालविकास कार्यालय, बालकल्याण समिती, दिशा संस्था, चाई्ल्ड लाईन, जिल्हा बालकल्याण संरक्षण कार्यालय अधिकारी व कर्मचारी बैठकीला उपस्थित होते. हरविलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना पाल्यांच्या ताब्यात कसे देता येईल, यासंदर्भात सर्वांनी नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले.
भीक मागणाऱ्या मुलांना जे कुणी सार्वजनिक ठिकाणी अन्न पुरवित असेल, पैसे देत असेल तर त्यांनी अशा प्रकारे मदत न करता, चाईल्ड लाईन व दिशा या संस्थांची मदत घेऊन संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क करावा. ह्या व्यतिरिक्त काही मदतीची आवश्यकता असल्यास पोलीस नियंत्रण कक्ष, महिला सहाय्य कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.