अमरावती : बहिणीची छेड काढल्याप्रकरणी राग अनावर झाल्याने दोन अल्पवयीन मुलांनी वचपा काढण्यासाठी एका २१ वर्षीय युवकाला चाकूने भोसकून शुक्रवारी लुंबिनीनगरात त्याची निर्घृण हत्या केली. मृत रितेशसोबत यातील एका अल्पवयीन आरोपीने मोबाईल चोरला होता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत पुढे आली.
आरोपी व मृत रितेश यांची यापूर्वीच ओळख असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मृत रितेशसुद्धा रेकॉर्डवरील आरोपी होता. त्याच्यावर फ्रेजरपुरा ठाण्यात चोरी, लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १६ व १७ वर्षीय विधी संघर्षित बालकावर भादंविचे कलम ३०२, ३४, सहकलम ४,२५ आर्म अक्टनुसार गुन्हा नोंदविला होता.
रितेश हा मोलमजुरीचे काम करीत होता. त्याने यातील एका आरोपीच्या बहिणीची छेड काढली होतीे. ज्या आरोपीच्या बहिणीची छेड काढली. त्या आरोपीसोबत मृत रितेशने पाच महिन्यांपुर्वी फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत मोबाईलची चोरी केली होती. त्यामुळे पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंदविला होता, अशी माहिती ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांनी दिली.
आरोपी हे अल्पवयीन तथा विधि संघर्षित बालक असल्यामुळे त्यांना कायदानुसार अटक करता येत नाही. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी पुढील कारवाईकरिता बालसुधारगृहात त्यांची रवानगी केली होती. खूनाच्या घटनेनंतर काही वेळातच पोलिसांनी दोन्ही आरोपींना पोहरा मार्गावरून ताब्यात घेतले होते.