परतवाड्यातील सराफा दुकानात ७८ लाखांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 01:03 AM2019-08-26T01:03:53+5:302019-08-26T01:08:08+5:30

शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी, तीन हजार रुपये रोख व सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला.

78 lac theft in jewelry shop | परतवाड्यातील सराफा दुकानात ७८ लाखांची लूट

परतवाड्यातील सराफा दुकानात ७८ लाखांची लूट

Next
ठळक मुद्देअडीच किलो सोने, चांदी लंपास : कटरने तोडली कुलपे

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम चांदी, तीन हजार रुपये रोख व सीसीटीव्हीचा डीव्हीआर लंपास केला.
चोरांनी दुकानाला लागलेली १० कुलपे कटरने तोडली. सराफा दुकानात प्रवेश करून पाच तिजोऱ्या उघडण्याचा प्रयत्न केला. यात लहान तिजोरी त्यांच्याकडून उघडली गेली. या तिजोरीतील लोकांनी गहाण ठेवलेले जवळपास ७७ लाख रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने पिशवीत भरून चोर निघून गेलेत. सदर बाजार वर्दळीचे ठिकाण आहे. यातच श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे रात्री उशिरापर्यंतही सदर बाजार जागीच होता. असे असताना भरवस्तीत ही चोरी झाली. ज्या चारचाकी वाहनाने चोर आलेत, त्याच वाहनाने ते पसार झालेत. दुकानाशेजारी असलेले एक दोन जण लघुशंकेकरिता उठले असता, त्यांना आवाज आला. त्यांना चोर कारमधून पळून जाताना दिसलेत. याची माहिती परतवाडा पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झालेत. पोलीस विभागातील वरिष्ट अधिकारीही घटनास्थळी दाखल झालेत. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञही पोहोचलेत. पोलिसांचे एक पथक चोरांच्या शोधार्थ रवाना झाले आहे.
पोलिसांपुढे आव्हान
परतवाडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर या जबरी चोरीमुळे परत एकदा प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. यापूर्वी ६ मे रोजी विवेक अग्रवाल यांच्या घरी पडलेल्या दरोड्याचा तपास अजूनपर्यंत लागलेला नाही. या दरोड्यात चोरांनी २० लाख ७८ हजारांचा माल लंपास केला होता. यानंतर १८ जुलैला शहरात एकाच दिवशी चोरांनी पाच दुकाने फोडलीत. यानंतर २३ जुलैला पहाटे एक कृषिसेवा केंद्र फोडले. ६ मे रोजीच्या दरोड्यासह अन्य या दुकानफोडीतील आरोपी पोलिसांना अजूनपर्यंत गवसलेले नाहीत. यातच रविवारच्या सराफा दुकानफोडीमुळे ‘पोलीस सुस्त चोर मस्त’चा प्रत्यय नागरिकांना आला आहे.
शहरातील व्यावसायिक वर्तुळामध्ये चोरीच्या मालिकेमुळे प्रचंड दहशत पसरली आहे.

बेवारस कार आढळली
परतवाडा येथील व्यापारी प्रतिष्ठाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरणाºया आरोपींनी गुन्ह्यात कारचा वापर केला. रविवारी सकाळी अमरावतीच्या अ‍ॅकेडमिक ग्राऊंड परिसरात एमएच २९ आर १५६९ या क्रमांकाची कार बेवारस स्थितीत आढळून आली. हीच कार परतवाड्यात सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ती २४ आॅगस्ट रोजी असीर कॉलनीतून चोरी गेली होती.

एकाच रात्री पाच दुकाने फोडली
सदर बाजार स्थित ईश्वरदास पन्नालाल अग्रवाल यांचे सराफा दुकान फोडतानाच २५ आॅगस्टला पहाटे परतवाडा शहरातील गुजरी बाजार स्थित केडिया किराणा दुकान, जयस्तंभवरील खंडेलवाल कृषी केंद्र आणि अचलपूर रोडवरील अनंत मेडिकल्स चोरट्यांनी फोडले. यात खंडेलवाल कृषिसेवा केंद्राचे तीन कुलूप तोडून १ हजार १० रुपये रोख चोरांनी पळविले. रवि गुप्ता यांच्या अनंत मेडिकल्समधून दहा हजार रुपये रोख व डीव्हीआरही पळवून नेला. गुजरीबाजार स्थित केडिया किराणा स्टोअर्समधून कुलूप तोडून ५ ते १० हजारांची, तर बाजूलाच असलेल्या केडिया जनरल स्टोअर्समधूनही कुलूप तोडून ५ ते १० हजार लंपास केलेत. एकाच रात्री पाच दुकाने फोडण्याची ही दुसरी वेळ असून, यापूर्वी १८ जुलैला चोरांनी याच पद्धतीने पाच दुकाने फोडली होती. या घटनांच्या अनुषंगाने वृत्त लिहिस्तोवर दुपारी सव्वा वाजेपर्यंतही पोलीस काही माहिती द्यायला तयार नव्हते. स्टेशन डायरी गुन्हा दाखल नसल्याचे सांगत होते, तर ठाणेदार राजेंद्र पाटील गुन्हा दाखल झाल्यानंतर स्टेशन डायरीवरून माहिती घेण्याचा सल्ला देत राहिले. दरम्यान, एसडीपीओ अब्दागीरे परतवाडा पोलीस ठाण्यात तळ ठोकून असून, सराफा दुकानदारांच्यावतीने त्यांना निवेदन देण्यात आले.

Web Title: 78 lac theft in jewelry shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर