अमरावती : पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आता दिवाळीपूर्वी दोन गणवेश मिळणार आहे. शासनाने गणवेशाच्या निधीला मंजुरी दिली असून शाळा व्यवस्थापन समितीच्या अधिपत्याखाली या गणवेशाचे वितरण केले जाणार आहे. शहरातील १० हजार ३३०, तर ग्रामीण भागातील ६४ हजार ८८७ विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यासाठी ४ कोटी ५१ लाख ३० हजार २०० रुपयांची निधी मंजूर केला आहे.
शासनाच्यावतीने दरवर्षी पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थिनी तसेच मागासवर्गीय मुलांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील कोरोनाच्या सावटात शाळा बंद आहे. परंतु, विद्यार्थ्यांच्या हक्काचा गणवेश त्यांना मिळणे गरजेचे असताना शाळेचे सत्र सुरू होऊनदेखील शासनाकडून याची परवानगी अप्राप्त होती. अखेर समग्र शिक्षा अंतर्गत शासनाने हिरवीझेंडी देत गणवेश वाटप करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत. याकरिता निधीलादेखील मंजुरी दिली आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीपूर्वीच विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार आहे. दोन गणवेशांकरिता सहाशे रुपये याप्रमाणे ४ कोटी ५१ हजार ३० हजार २०० रुपये शाळा व्यवस्थापन समितीस्तरावर वितरित केले जाणार आहेत. त्यांच्या अधिकारात गणवेशाची निवड आणि वितरण होईल.
बॉक़्स
शिक्षक समितीच्या पाठपुराव्याला यश
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील लाभार्थी विद्यार्थांना समग्र शिक्षामधून दोन गणवेश मिळावे, याकरिता शासनाला निवेदन सादर करून वारंवार पाठपुरावा केला होता. याला यश आले असून या वर्षाला दोन गणवेश मिळणार आहे.मागील वर्षाला एकच गणवेश देण्यात आला होता. शाळांना निधि प्राप्त होताच गणवेश खरेदीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती, अशी माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य प्रतिनिधी राजेश सावरकर यांनी दिली.