लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्वास घ्यायला त्रास होत असल्याने २२ दिवसांच्या बाळाच्या पोटाला दोर जाळून चटके (डम्मा) दिले. हा प्रकार मेळघाटात पुन्हा एकदा उघडकीस आला. या अघोरी उपायाने बाळाची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारांसाठी जिल्हा स्त्री रुग्णालयात एसएनसीयूमध्ये दाखल करण्यात आले. जवळपास ६५ चटके दिल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी बाळचा आई विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. याबाबत वडिलांनी तक्रार नोंदविली. मेळघाटात आजही येथील आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या आहारी जातो. चिखलदरा तालुक्यातील हतरू प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सिमोरी या गावातील फुलवंती राजू धिकार या महिलेने ३ फेब्रुवारीला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला.
श्वसनाच्या त्रासावर उपाय म्हणून अगदी काही दिवसांच्या या बाळाच्या पोटावर चटके (डम्मा) देण्यात आले. मात्र, प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी बिघडल्याने त्याला २३ फेब्रुवारीला त्याला हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तेथून या बाळाला २४ फेब्रुवारीला चुरणी ग्रामीण रुग्णालय, नंतर अचलपूर उपजिल्हा रुग्णालय आणि त्याच रात्री प्रकृती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथे रेफर केले. बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर एसएनसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहे.
काय आहे टीजीए ?'टीजीए' आजारात हृदयापासून फुफ्फुसांपर्यंत रक्त वाहून नेणारी फुफ्फुस धमनी उजव्या ऐवजी डाव्या वेट्रिकलशी जोडली असते, तर हृदयापासून शरीरात ऑक्सिजनयुक्त रक्त वाहून नेणारी महाधमनी डाव्या वेंट्रिकलऐवजी उजव्या वेंट्रिकलशी जोडली असते. रक्त संपूर्ण शरीरात पंप होते. त्यामुळे अवयवांचे नुकसान होते.
हृदयाशी संबंधित 'टीजीए' हा दुर्मीळ दोषजिल्हा स्त्री रुग्णालयात ते नवजात २४ फेब्रुवारीच्या रात्री दाखल झाले. श्वास घेण्यास होत असलेला त्रास पाहून संबंधित डॉक्टरांनी त्याची आवश्यक तपासणी केली. बाळाला हृदयाचा त्रास असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बुधवारी बाळाचे टू-डी इको करण्यात आले. त्यामध्ये बाळाला हृदयाशी संबंधित टीजीए ट्रान्सपोजिशन ऑफ द ग्रेट आर्टरीज) हा दुर्मीळ व जीवघेण्या दोषाचे निदान झाले.
"बाळाच्या पोटावर चटके दिले आहेत. त्याला श्वास घेण्यास त्रास होत त्याचे टू डी इको करण्यात आले. यामध्ये बाळाला हृदयाशी संबंधित टीजीए हा दुर्मीळ दोष आढळून आला आहे. त्यामुळे बाळाच्या पुढील शस्त्रक्रियेसाठी त्याला रेफर करण्याची प्रक्रिया सुरू आहे."- डॉ. अमोल फाले, एसएनसीयू विभागप्रमुख, डफरीन