अमरावती : ऑनलाईन फसवणूक करून गंडविलेल्या युवकाच्या प्रकरणाचा शहर सायबर पोलिसांनी छेडा लावून त्याचा तांत्रिक तपास करून त्या रकमेची रिकव्हरी केली. तसेच ती रक्कम मूळ फिर्यादीला शुक्रवारी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या हस्ते परत करण्यात आली.
राहुल सुरेश मेश्राम (२०, रा. यशोदानगर) यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. फिर्यादीला एअरपोर्टस ऑथोरीटी ऑफ इंडिया शाखा गोवा येथे नोकरी मिळवून देतो, अशी बतावणी करून त्याचा विश्वास संपादन करून आरोपीने त्याला ८८ हजार २७० रुपये पाठविण्यास सांगितले. त्याने तसे केले असता, त्याची फसवणूक करण्यात आली. ही घटना ९ ऑगस्ट २०२० रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ ट्रान्जेक्शनचा अभ्यास करून तांत्रिक पद्धतीने तपास करून विविध बँकांच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क करून तक्रारदाराच्या फसवणुकीचे ६० हजार परत मिळविले. सदर तपास पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रवीण काळे व त्यांच्या पथकाने केला.