अमरावती : देशातील उच्च दर्जाच्या संशोाधनास प्रोत्साहन मिळावे, यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे विविध शिष्यवृत्ती दिली जाते. काही वर्षांपासून यात वाढ केली नसल्याने यूजीसीने या योजनेत ५५ टक्के वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासह संशोधनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. यूजीसीतर्फे विद्यार्थ्यांना १५ प्रकारांतील शिष्यवृत्तीचे दरवर्षी वाटप केले जाते. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पात्र विद्यार्थ्यांची संख्याही बरीच आहे. नोव्हेंबरअखेर शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात बी.एस.आर. फेलोशिप, जेआरएफ अॅन्ड एआरएफइन सायन्स, ह्यूमिनीटीज अॅन्ड सोशल सायन्स, जेआरएफ अॅन्ड एमआरए टू फारेन नेशन या शिष्यवृत्तीचा समावेश असून ती संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येते. दोन वर्षांचे जेआरएफ पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एमआरएफ शिष्यवृत्तीसाठी पुन्हा अर्ज करता येते. तसेच पीजी स्कॉलरशिप प्रोफेशनल कोर्स फॉर एससी, एसटी स्टुडंट्स ही शिष्यवृत्ती एमबीए, इंजिनीअरिंग यासारख्या प्रोफेशन कोर्ससाठी देण्यात येते. याशिवाय पीजी स्कॉलरशिप फॉर युनिर्व्हसिटी वॅर्क होल्डर्स ही शिष्यवृत्ती पदवीपूर्ण झालेल्या आणि प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. पीजी स्कॉलरशिप फॉर गेट, जीपीएटी उत्तीर्ण झालेल्या एम.ई. एम.टेक, एम फार्मातील विद्यार्थ्यांना, पीजी इंदिरा गांधी स्कॉलरशिप फॉर सिंगल गर्ल चाईल्ड ही शिष्यवृत्ती एकच अपत्य ते ही मुलगी असल्यासच देण्यात येते. यासाठी आॅनलाईन अर्ज करावा लागतो. या शिष्यवृत्तीची रक्कम वीस महिन्यांनुसार प्रत्येक महिन्यात साधारणत: दोन ते चार हजारांपर्यंत असते. मात्र शैक्षणिक वर्ष २०१४-१५ पासून या रकमेत ५५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याची संपूर्ण माहिती यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रक्कम अधिक मिळणार असून संशोधन कार्य गतिमान होणार आहे.
यूजीसी शिष्यवृत्ती रकमेत ५५ टक्के वाढ
By admin | Updated: December 27, 2014 00:47 IST