संकटांची मालिका : शेंगा पोचट, दाणा बारीक, एकरी उतारा सरासरी दोन पोतेगजानन मोहोड - अमरावतीसिंचनाचे संरक्षित क्षेत्र वगळता जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरमधील सोयाबीन क्षेत्रात शेतकऱ्यांना ५०० कोटींपेक्षा अधिक नुकसान होण्याची शक्यता आहे. दीड महिना उशिरा झालेली पेरणी, निकृष्ट बियाणे, रोगांचा प्रादुर्भाव, सोयाबीन फुलोरावर व शेंगा भरण्याच्या स्थितीत असताना पावसाने दिलेली दडी यामुळे सोयाबीनच्या शेंगा पोचट राहिल्या, दाणे बारीक झालेत. करपलेली रोपे शेतातच सडली. परिणामी मळणीनंतर शेतकऱ्यांचा अर्धा उत्पादन खर्चदेखील निघालेला नाही. दोन वर्षांपासून सोयाबीन पीक धोक्यात येत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कपाशीवर वारंवार बोंडअळी व अन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याने उत्पादन खर्चही पदरी पडत नाही. त्यामुळे गेल्या दशकापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मूग, उडदासारखेच अल्पकालावधीमधील सोयाबीन पेरण्यास सुरुवात केली. यंदा खरीप हंगामात ७ लाख १४ हजार एकूण पेरणीक्षेत्रापैकी ३ लाख १९ हजार ९८५ हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी झाली. मात्र, जून महिन्यापासून दीड महिन्यापर्यंत पावसाने दडी दिली. जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून पेरणीला सुरुवात झाली. मात्र, पुन्हा पावसाचा खंड पडल्याने तसेच उगवणशक्ती कमी असणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आली. पेरणीचा कालावधी संपल्यानंतरच्या पेरणीमुळे सोयाबीनच्या वाढीसाठी पुरेसा अवधी मिळाला नाही. निकृष्ट बियाणे, दिवसाचे उष्ण तापमान, रात्रीची थंडी व जमिनीत नसलेली आर्द्रता यामुळे पिकावर पिवळ्या मोझॅकचा प्रादुर्भाव झाला. तसेच करप्या रोगामुळे रोपे शेतात सडू लागली. यामुळे सरासरी उत्पन्नात ५० टक्क्यांवर घट येण्याची शक्यता निर्माण झाली. पावसाच्या दृष्टीने सोयाबीन हे अतिसंवेदनशील पीक आहे. १० ते १२ दिवसांच्या अंतराने त्याला पाण्याची आवश्यकता असते. विशेषत: फुलोेर आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत पावसाची गरज असते. परंतु याच कालावधीत पाऊस बेपत्ता झाल्याने शेंगा पोचट होऊन दाणा बारीक झाला आहे. सध्या सोयाबीन कापणी व मळणीचा हंगाम सुरू आहे. एकरी १० हजारांवर उत्पादन खर्च असताना सरासरी १ किंवा २ पोत्यांचा उतारा शेतकऱ्यांना मिळत आहे.
सोयाबीन उत्पादकांचे ५०० कोटींवर नुकसान
By admin | Updated: October 30, 2014 22:43 IST