अमरावती : भविष्यात पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने नगरोत्थान योजनेतंर्गत अमरावती व बडनेरा शहरासाठी ४८.२२ कोटींच्या वाढीव पाणी पुरवठा योजना प्रस्ताव तयार केला आहे. मात्र या योजनेची फाईल मुख्यमंत्र्यांच्या दालनात मंजुरीच्या प्रतीक्षेत असून ती लवकर मार्गी लागावी, यासाठी आमदारांच्या रेट्याची गरज आहे.नगरोत्थान अंतर्गत शासन अनुदान आणि लोकवर्गणीतून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याच्या अनुषंगाने जीवन प्राधिकरणाने वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव मागील दोन वर्षांपूर्वी तयार केला होता. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींचा शासन स्तरावर रेटा कमी पडल्याने ही योजना प्रलंबित राहिली. मात्र शहराचे विस्तारीकरण झपाट्याने वाढत चालल्याने नागरिकांच्या मागणीनुसार पिण्याच्या पाण्याची निकड लक्षात घेता ती पुरविण्याचा दृष्टीने जीवन प्राधिकरणाने उपाययोजना सुरु केल्या आहेत. वाढीव पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर करावा, यासाठी महापालिका आमसभेत ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. या योजनेच्या पूर्णत्वासाठी जीवन प्राधिकरणाने ३० टक्के निधी खर्च करण्याची तयारी देखील केली आहे. केवळ शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा असून नगरोत्थान अंतर्गत अनुदान सुद्धा उपलब्ध आहे. एकदा वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली की, भीषण पाणी समस्येतून नागरिकांना मुक्तता मिळेल, हे वास्तव आहे. यापुर्वी ही योजना ४४.४४ कोटी रुपयांची होती. मात्र बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने आता चालू दरानुसार ही योजना ४८.२२ कोटी रुपयांवर पोहचली आहे. ७० टक्के शासन अनुदान तर ३० टक्के लोवर्गणीतून वाढीव पाणी पुरवठ्याची योजना मार्गी लावण्याचे निकष आहे. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने २८ जानेवारी २०१५ रोजी नगरपरिषद संचालनालयाचे उपसंचालक यांच्याकडे वाढीव पाणी पुरवठा योजनेचा सुधारीत प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता अरविंद सोनार यांनी दिली.(प्रतिनिधी)
४८.२२ कोटींच्या पाणीपुरवठा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या दालनात
By admin | Updated: February 9, 2015 23:05 IST