अमरावती : जिल्ह्यातील विविध प्रयोगशाळांच्या चाचण्यांतून शुक्रवारी ३३६ कोरोना संक्रमित आढळून आले, तर उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४४ हजार ५५८ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत, तर ६२१ रूग्ण दगावल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाने केली आहे.
यावली शहीद येथील ५५ वर्षीय पुरुषाचा पीडीएमसीमध्ये आणि मंगरूळपीर येथील ७२ वर्षीय पुरुषाचा खासगी कोविड रुग्णालयात मृत्यू झाला. २८० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून, आतापर्यंत तयांची एकूण संख्या ३९ हजार ५३७ एवढी संख्या आहे. गृहविलगीकरणात महापालिका क्षेत्रात १७२८, तर ग्रामीण भागात १५५७ रुग्ण उपचार घेत आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण ४३६४ असून, रिकव्हरी रेट ८८.८१ टक्के आहे. मृत्युदर १.३९ टक्के असल्याची नोंद आहे. कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने धोका कायम असल्याचे चित्र आहे. मात्र, बाजारपेठेतील गर्दीदेखील कमी होण्याचे नाव घेत नाही, हे वास्तव आहे. महापालिका, महसूल व पोलीस प्रशासनाकडून मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई बंद करण्यात आल्याचे दिसून येत आहे.