डिजिटल योजना : ‘एनओएफएन’ प्रकल्पाद्वारे ब्रॉडबँडने करणार जोडणीलोकमत विशेष
अमरावती : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया योजनेंतर्गत नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन) प्रकल्पाद्वारे ३२६ ग्रामपंचायतींची ब्रॉडबँडने जोडणी केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायती हायटेक होऊन थेट दिल्लीशी जोडल्या जाणार आहेत. केंद्र शासनाने ‘डिजिटल इंडिया’ ही संकल्पना जाहीर केली. यामध्ये भारत संचार निगमची महत्त्वाची भूमिका आहे. केंद्र शासनाच्या संपूर्ण अर्थसाहाय्याने ग्रामीण भागात इंटरनेटचे जाळे उभारण्यासाठी ‘नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क’ प्रकल्पाची योजना आखून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ८४३ ग्रामपंचायतींपैकी पहिल्या टप्प्यात ३२६ ग्रामपंचायतींमध्ये आॅप्टिकल फायबर केबलच्या माध्यमातून ब्रॉडबँड जोडणी करणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात निवडक तालुक्यांतील ग्रामपंचायती जोडण्यात येणार आहेत. त्यानंतर उर्वरित ग्रामपंचायतीसुद्धा जोडण्यात येणार असून ब्रॉडबँड जोडणीद्वारे पंचायत समिती पुढे जिल्हा परिषदेला तर सर्व जिल्हा परिषदा याच जोडणीने मुंबईला जोडली जाईल. याशिवाय ई-लर्निंग योजनेंतर्गत सर्व ग्रामीण व शहरी शाळा ब्रॉडबँड सेवेद्वारे जोडली जाईल. टपाल कार्यालयेदेखील हायटेक होणार असून बँकिंग क्षेत्रातील सुविधा टपालाच्या माध्यमातून गावपातळीवर दिली जाईल. यासाठी जिल्ह्यातील ३२६ गावांसाठी ७५४ किलोमिटरचे केबल टाकण्यात येणार आहे. यामुळे पंचायतीची माहिती एका क्लिकवर गल्ली ते दिल्लीपर्यंत उपलब्ध होईल. यासाठी तब्बल ७५४ किलोमीटरपर्यंत केबल टाकण्यात येणार आहे. डिजिटल इंडिया अंतर्गत सर्व ग्रामपंचायती ब्रॉडबँडने जोडण्यासाठी युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. येत्या दोन महिन्यांत पहिल्या फेजचे काम पूर्ण होईल. यामुळे ग्रामपंचायतींमध्ये हायटेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. - जे.एन. आभाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.