सुनील देशमुखांची माहिती : बेलोरा विमानतळावरुन ७२ आसनी विमान सेवा सुरू होणार अमरावती : जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बेलोरा विमानतळावरून भविष्यात ७२ आसनी विमान (एटीआर) सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या विमानात आमदार, खासदार, मंत्री आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी २० टक्के राखीव सीट ठेवल्या जातील. मात्र या राखीव सीटवर संबंधितांनी प्रवास केला नाही तर त्याचे प्रवासभाडे हे शासन अदा करेल, या संकल्पनेवर बेलोरा विमानतळावरून विमान सुरु करणार असल्याची माहिती विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आ. सुनील देशमुख यांनी दिली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षस्थानी मुंबई मंत्रालयात मंगळवारी बेलोरा विमानतळाच्या विकास कामासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र काही तांत्रिक कारणांमुळे ही बैठक स्थगित करण्यात आली. आ. सुनील देशमुख यांच्यानुसार बेलोरा विमानतळाच्या विकासाचा मार्ग सुकर झाला आहे. विमानतळाचा विकास करण्याच्या अनुषंगाने एमएसआरडीसीमार्फत प्लॅन तयार केला जाणार आहे. धावपट्टीची लांबी १२०० हून १८०० मीटर लांब केली जाणार आहे. बेलोरा विमानतळाच्या जुन्या धावपट्टीला एअरपोर्ट अथॉरटी आॅफ इंडियाने मान्यता प्रदान केली नाही. त्यामुळे नव्याने धावपट्टी तयार करुन त्याला मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता आहे. बेलोरा ते जळू या दरम्यान पाऊणेचार कि.मी. लांबीचा वळण रस्ता निर्मितीचे उद्दिष्ट्य आहे. अमरावतीहून प्रवासी विमान सेवा सुरू करण्याला प्राधान्य देण्याबाबत शासन अनुकूल आहे. बेलोरा विमानतळाच्या विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मुख्यमंत्रीे सकारात्मक असल्याचे आ.देशमुख म्हणाले. विमानतळाच्या विस्तारीकरणासह रस्ते, पाणी, उच्च दाब विद्युत लाईन आदी विकासकामांना गती दिली जाणार आहे. बेलोरा विमानतळाचे विकास कामे आटोपताच ७२ आसनी विमान (एटीआर) सुरु करण्याला अगोदरच शासनाने मान्यता प्रदान केली आहे. विमान सेवा सुरू करताना प्रारंभी ते तोट्यात चालू नये, यासाठी आमदार, खासदार, मंत्रीगण आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी २० टक्के सीट राखीव ठेवण्याचा प्रस्ताव शासनाकडे दिला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, यात दुमत नाही. मात्र २० टक्के राखीव सीटवर सदर व्यक्तींनी प्रवास न केल्यास ते भाडे शासनाकडून देण्याचे धोरण आहे. त्यामुळे प्रवासी विमान सेवा देणाऱ्या कंपनीला तोटा होणार नाही, ही काळजीदेखील विधिमंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीने घेतल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.गत काही वर्षांपासून बेलोरा विमानतळाचा विकास रखडला. मात्र नुकतेच महाराष्ट्र विधी मंडळ सचिवालय सार्वजनिक उपक्रम समितीने जिल्ह्यातील दौरा केला होता. यात बेलोरा विमानतळ, चिखलदरा पर्यटन स्थळ विकास व महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये प्रकल्प पाहणी दौरा केला होता. (प्रतिनिधी)विमान सेवेकरिता खासगी कंपनीसोबत करारबेलोर विमानतळाहून ७२ आसनी विमान सेवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरण हे खासगी कंपनीसोबत करार करणार आहे. चांगल्या दर्जाची विमानसेवा मिळावी, हा राज्य शासनाचा प्रयत्न सुरु आहे. मुंबई, पुणे विमान सेवेला प्रधान्य दिले जाणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विमान सेवा सुरू करून जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना चालना देण्याचा मानस आहे.काही कारणास्तव बेलोरा विमानतळ विकासकामांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली बैठक स्थगित करण्यात आली आहे. मात्र पुढील आठवड्यात ही बैठक होणार असून प्रलंबित मुद्दे निकाली काढले जातील. बेलोरा विमानतळाहून प्रवासी विमान सेवा सुरू होईल.- सुनील देशमुख, आमदार, अमरावती
विमानात आमदारांसाठी २० टक्के राखीव सीट
By admin | Updated: March 16, 2016 08:29 IST