मेळघाटातील ब्रिटिशकालीन २० पूल अत्यंत धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 10:52 AM2021-07-24T10:52:43+5:302021-07-24T10:54:02+5:30

Amravati News शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत.

20 British-era bridges in Melghat are very dangerous | मेळघाटातील ब्रिटिशकालीन २० पूल अत्यंत धोकादायक

मेळघाटातील ब्रिटिशकालीन २० पूल अत्यंत धोकादायक

Next
ठळक मुद्देभूतखोरा पूल दुरुस्तीचे व्याघ्र प्रकल्पाला पत्रहरिसाल सेमाडोह दिया येथे नवीन पुलांची निर्मिती

नरेंद्र जावरे

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : शंभर वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेल्या मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील मुख्य मार्गावरील ब्रिटिशकालीन ११८ पुलांपैकी २० पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक ठरले आहेत. परतवाडा - इंदूर मार्गावरील सेमाडोहचा भुतखोरा पूल खचल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पूल दुरुस्तीसाठी व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र दिले. चार नवीन पुलांच्या निर्मितीसह १६ पुलांची दुरुस्ती आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात अनेक गावांचा संपर्क तुटण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

मेळघाटात गुरुवारी पहाटे ढगफुटी झाली. मुसळधार पावसामुळे नदी-नाले ओसंडून वाहू लागले आहेत. सिपना, चंद्रभागा, शहानूर, खुर्शी आदी नद्यांना पूर आला. परिणामी अनेक ठिकाणी दरड कोसळल्या, रस्ते खरडून गेले. त्यातच मुख्य मार्गावरील पुलांनासुद्धा क्षती पोहोचली आहे. पूल दुरुस्तीसाठी सिपना वन्यजीव विभागाच्या उपवनसंरक्षकांना सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे दुरुस्तीच्या परवानगी संदर्भात पत्र देण्यात आले आहे. मेळघाटातील विकासात्मक कामासाठी आता व्याघ्र प्रकल्पाची परवानगी गरजेची झाली आहे. सेमाडोह येथील भुतखोरा पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रवास करताना दक्षता घेण्याचे फलक लावले आहेत. पुलावरून पाणी वाहत असल्यास ही वाहतूक बंद ठेवली जाणार आहे.

पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

परतवाडा ते धारणी इंदूर मार्गावरील सेमाडोह (भुतखोरा) हरिसाल येथील ४० वर्षे जुन्या पुलाचे बिम, गडर उघडे पडल्याने धोका निर्माण झाला आहे. धारणी ते दिया मार्गावरील दोन पुलांसह एकूण चार नवीन पुलांची निर्मिती तातडीने करायची आहे. हे पूल न झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

मेळघाटातील ११८ ब्रिटिशकालीन पुलांपैकी चार नवीन पुलांची निर्मिती व १६ पुलांची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे. हे सेमाडोह हरिसाल दिया येथील महत्त्वपूर्ण प्रस्तावित केलेले पूल आहेत. भूतखोरा पुलासंदर्भात व्याघ्र प्रकल्पाला गुरुवारी दुरुस्तीच्या परवानगीचे पत्र पाठविले आहे.

- चंद्रकांत मेहत्रे,

कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अचलपूर

पुलाच्या दुरुस्ती संदर्भात व्याघ्र प्रकल्पाच्या अधिनियमानुसार परवानगी आवश्यक आहे. पत्र मिळाल्यावर वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात येईल. त्यानुसार योग्य निर्णय कळविला जाईल.

- कमलेश पाटील,

सहायक वनसंरक्षक,

सिपना वन्यजीव विभाग, परतवाडा

Web Title: 20 British-era bridges in Melghat are very dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.