अमरावती : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. १६ आॅक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात १५० जादा बस गाड्याचे नियोजन केले आहे. याशिवाय १९ आॅक्टोबर रविवारपासून २२ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातून अतिरिक्त एसटी बसेस सोडणार आहे. पुणे येथील शिवाजीनगर बसस्थानकावरून ही खास सुविधा सुरू केली आहे, असे राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एरव्ही जिल्ह्यात नियमित सुटणाऱ्या बसेस शिवाय जिल्ह्यातील आठ आगारामधून अतिरिक्त बसेस सोडण्याची व्यवस्था केली आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ज्यादा बसगाड्या सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन विभागाच्या विभागीय कार्यालयाने घेतला आहे. मागील वर्षी जिल्ह्यातून ४० बसेसचे नियोजन केले होते. यावेळी मात्र यामध्ये तीन पट वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार जास्तीच्या बसेस उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.पुणे, औरंगाबाद, नांदेड, नाशिक, जळगाव अशा महत्त्वाच्या ठिकाणी या बसेस सोडण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दिवाळीसाठी सुटणार जिल्ह्यात १५० एसटी बसेस
By admin | Updated: October 20, 2014 23:05 IST