अमरावती : येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील तसेच जिल्हाधिकारी यांच्या अधिपत्याखाली अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांत उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकाऱ्यांच्या १,३६८ अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत या पदांना मुदतवाढ मिळाली असून, अमरावती, अकोला, बुलडाणा, यवतमाळ व वाशिम या पाचही जिल्ह्यांत ‘महसूल’ला मोठा दिलासा मिळाला आहे.
महसूल व वनविभागाने १५ एप्रिल रोजी जारी केलेल्या शासनादेशानुसार अमरावती विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील आकृतीबंधातील १,३६८ अस्थायी पदांना मुदतवाढ मिळाली आहे. वित्त विभागाच्या १५ फेब्रुवारी २०२१ राेजीच्या शासनादेशाप्रमाणे या पदांना मुदतवाढ देण्यात आली आहे. महसूल विभागाची कामे खोळंबू नये, यासाठी शासनाने अस्थायी पदे कायम ठेवली आहे. विभागीय आयुक्त तथा पाचही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार ही पदे पुढे कायम ठेवण्यात आली आहेत.