लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगर परिषद क्षेत्रातून जाणारा चांदूर बाजार नाका ते अंजनगाव स्टॉप हा सहा किलोमीटरचा रस्ता चौपदरीकरणासह सिमेंट रोड होणार आहे. यावर शंभर कोटीचा खर्च अपेक्षित आहे.
नगरपरिषद क्षेत्रातून जाणारा हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाचा भाग आहे. अंजनगाव-बैतूल आणि चांदूर बाजार महामार्गाची ही लिंक आहे. त्याचे अंदाजपत्रक मंजूर असून शंभर कोटीची आर्थिक तरतूद असलेल्या या सहा किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे बांधकाम सुरू केले जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
झाडांची कत्तलपरतवाडा-अमरावती मार्गाच्या दुतर्फा असलेल्या हिव्यागार कडुनिंबाची ही शहराचे वैभवच. अनेक वर्षापासून पांथस्थांना ही झाले सावली देत आहेत. चौपदरीकरणासह सिमेंट रोड होणार असल्याने या कामात अडचण ठरत असल्याने दुतर्फा असलेल्या हिरव्यागार कडुनिंबाच्या झाडांची कत्तल केली जाणार आहे.
अमरावती मार्ग दुर्लक्षितराष्ट्रीय महामार्गाची लिंक म्हणून विकसित होणारा सहा किलोमीटर लांबीचा मार्ग अमरावती-परतवाडा-बुरडघाट मार्गाच्या प्रस्तावित विकासकामात अंतर्भूत आहे. शासन मान्यता व निधीअभावी चार वर्षापासून अमरावती मार्ग रखडला आहे. यातच बांधकाम विभागाने हाच मार्ग आसेगावपर्यंत बजेट अंतर्गत प्रस्तावित केला आहे.
"परतवाडा-अमरावती या मार्गाचे काम आसेगावपर्यंत बजेट अंतर्गत नव्याने टाकण्याचा आले आहे. अमरावती-बुरडघाट पर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच प्रस्तावित करण्यात आले आहे. या मार्गाचा विकास आराखडाही तयार आहे."- अभय बारब्दे, उपविभागीय अभियंता
"चांदूर बाजार नाका ते अंजनगाव स्टॉपपर्यंत सहा किलोमीटर लांबीचा सिमेंट रोड तयार केला जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाची ती लिंक आहे."- तिलकराज वासनकर, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण