- आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धूमशान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 06:00 AM2019-11-01T06:00:00+5:302019-11-01T06:00:46+5:30

लोकसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही तोच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले. दिवाळीत ही रणधुमाळी संपली असतानाच तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाने २९ ऑक्टोबरला जाहीर केला. यामध्ये आरक्षणाची सोडतदेखील काढली जाणार आहे.

- | - आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धूमशान

- आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये धूमशान

Next
ठळक मुद्देचार महिने पुन्हा निवडणुकांचा ज्वर : महापौर, उपमहापौर, जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, तीन पंचायत समिती निवडणूक अन् पोटनिवडणूक

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानसभा निवडणूक आटोपत नाही तोच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे. महापौर, उपमहापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती यांची निवड, तीन पंचायत समित्यांची निवडणूक, जिल्हा परिषद पोटनिवडणूक तसेच जिल्ह्यात ५२९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा गदारोळ येत्या चार महिन्यांत राहणार आहे. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची लगबगदेखील सुरू झालेली असल्याने जिल्ह्यात पुढील चार ते पाच महिने निवडणूक ज्वर कायम राहणार आहे.
लोकसभा निवडणुकांचा धुराळा खाली बसत नाही तोच विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजले. दिवाळीत ही रणधुमाळी संपली असतानाच तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम आयोगाने २९ ऑक्टोबरला जाहीर केला. यामध्ये आरक्षणाची सोडतदेखील काढली जाणार आहे. तिवसा पंचायत समितीमध्ये सहा, चांदूर रेल्वे पंचायत समितीमध्ये सहा व धामणगाव रेल्वे पंचायत समितीमध्ये आठ गण आहेत. ११ नोव्हेंबरला अंंतिम प्रभागरचना जिल्हाधिकाऱ्यांद्वारे राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विधानसभेसाठी मतदारयादीचा कार्यक्रम मागील महिन्यात झाला असल्याने आता मतदारयादीचा कार्यक्रम जाहीर न करता आयोगाद्वारे थेट सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यात होण्याची शक्यता आहे व डिसेंबरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.
दर्यापूर तालुक्यातील गायवाडी जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य बळवंत वानखडे व व वरूड तालुक्यातील बेनोडा सर्कलचे सदस्य देवेंद्र भुयार विधानसभा सदस्य झाल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे या दोन्ही गटांची निवडणूक तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबत येत्या डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. याविषयीचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक विभागाद्वारे राज्य निवडणूक आयोगाला पाठविणार असल्याची माहिती आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समिती सभापतींचा कार्यकाळ संपला आहे. विधानसभा निवडणुकांमुळे या पदाला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण येत्या १५ नोव्हेंबरमध्ये काढण्यात येणार असल्याने डिसेंबर महिन्यात या पदांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकारणात लॉबिंग सुरू झालेली आहे. पुढील चार महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय घडामोडींचा टेम्पो कायम राहणार आहे.

महापौर निवडीवरून शहराचे राजकारण तापणार
महापौर संजय नरवणे व उपमहापौर संध्या टिकले यांचा कार्यकाळ ८ सप्टेंबरला संपला. त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ असली तरी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात आरक्षण जाहीर होणार आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये अमरावती महापालिकेत पुन्हा घमासान पाहायला मिळणार आहे. ८७ सदस्यांच्या सभागृहात भाजप व मित्रपक्षांचे ४९ सदस्य आहेत. महापालिकेत आतापर्यंत सुनील देशमुख यांचा शब्द प्रमाण होता. मात्र, विधानसभेतील पराभवानंतर महापालिकेत याचे पडसाद उमटणार असल्याने शहराचे राजकारण तापणार आहे.

जिल्ह्यात ५२९ ग्रामपंचायतीमध्ये जानेवारीनंतर घमासान
जिल्ह्यात ५२९ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यानंतर मतदार यादीचा कार्यक्रम व लगेच सार्वत्रिक निवडणूक जाहीर होणार आहे. जानेवारीनंतर या निवडणुका होतील. यामध्ये अमरावती तालुक्यात ४६, तिवसा २७, भातकुली ३४, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ५३, नांदगाव खंडेश्वर ४४, दर्यापूर ४८, धारणी ३४, चिखलदरा १९, चांदूर बाजार ४२, अचलपूर ४१, मोर्शी ३९, वरूड ४१ व अंजनगाव सुर्जी तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अर्धेअधिक जिल्ह्यात या निवडणुका राहणार असल्याने गावागावांतील राजकारण पेटणार आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या प्रक्रियेला सुरुवात
विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणीची प्रक्रिया १ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरपर्यंत सुरु आहे. मतदार यादी नव्याने तयार करण्यात येणार असल्याने सर्वच शिक्षक संघटनांसोबत इच्छुकदेखील जोमाने कामाला लागले आहेत. विदर्भ ज्युनिअर टीचर्स असोसिएशन, शिक्षक आघाडी, शिक्षक महासंघ, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, खासगी शिक्षक संघटना, शिक्षक सेना यांसह अन्य संघटनादेखील अधिकाधिक मतदार नोंदणीसाठी कामाला लागले आहेत. यानिमित्ताने राजकीय क्षेत्रातील लगबग वाढली आहे.

Web Title: -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.