अकोला: इंदिरा आवास योजनेंतर्गत जिल्हय़ात यावर्षी दारिद्रय़रेषेखालील (बीपीएल) लाभार्थ्यांना ३ हजार १४ घरकुल वाटपाचे वाटपाचे उद्दिष्ट असले तरी, त्यापैकी शनिवारपर्यंंत केवळ ५६९ घरकुलांची कामे सुरू करण्यात आली. उर्वरित जिल्हय़ातील २ हजार ४४५ घरकुलांची कामे प्रस्तावाअभावी अडकली आहेत. केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या इंदिरा आवास योजनेंतर्गत दारिद्रय़रेषेखालील गरीब कुटुंबांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी ९५ हजार रुपयेप्रमाणे अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत सन २0१४-१५ या वर्षात जिल्हय़ात ३ हजार १४ घरकुल बांधकामाचे उद्दिष्ट शासनामार्फत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला देण्यात आले. त्यासाठी जिल्हय़ातील दारिद्रय़रेषेखालील लाभार्थी कुटुंबांसाठी ३ हजार १४ घरकुलांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणामार्फत मंजुरी देण्यात आली. मंजूर करण्यात आलेल्या घरकुल बांधकामांसाठी जिल्हय़ातील सातही पंचायत समित्यांकडून लाभार्थ्यांंचे प्रस्ताव मागविण्यात आले; परंतु मंजूर घरकुलांच्या तुलनेत प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यात ७७५ घरकुलांची बांधकामे मंजूर करण्यात आली. मंजूर घरकुलांपैकी २३ जानेवारी अखेर जिल्हय़ात केवळ ५६९ घरकुलांची बांधकामे सुरू करण्यात आली असून, उर्वरित २ हजार ४४५ घरकुलांची कामे अद्यापही रखडली आहेत. घरकुल बांधकामांसाठी लाभार्थ्यांंना अनुदान वाटपासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध असताना, पंचायत समिती व ग्रामसेवकांकडून लाभार्थ्यांंचे प्रस्ताव सादर करण्यात आले नसल्याने, जिल्हय़ातील २ हजार ४४५ घरकुलांची कामे अडकली आहेत. त्यामुळे या घरकुल बांधकामांचा निधीदेखील अद्याप अखर्चित असून, दारिद्रय़रेषेखालील संबंधित लाभार्थी घरकुलांच्या लाभापासून वंचित असल्याचे चित्र आहे.
गरिबांच्या घरकुलांची कामे अडकली!
By admin | Updated: January 25, 2016 02:18 IST