नरेंद्र बेलसरे/ अकोला बांगलादेशच्या निर्मितीसाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये १९७१ साली झालेल्या सोळा दिवसाच्या युध्दाला मंगळवार, १६ डिसेंबर रोजी ४३ वर्ष पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजुंनी तुफान गोळीबार, छिन्नविछीन्न झालेल्या मृतदेहांचे खच आणि अपरिमित हानी स्वत:च्या डोळय़ांनी पाहणारा या युद्धाचा साक्षीदार अकोला जिल्ह्यातील अंदुरा येथे वास्तव्यास आहे. स्वतंत्र बांगलादेशसाठी झालेल्या युद्धाला ४३ वर्षे पूर्ण झाली असली तरी, अंदुरा येथील माजी सैनिक नारायणराव साबळे यांचे डोळे युद्धाचे स्मरण झाले की, लगेच पाणावतात. आपल्या अकरा साथीदारांचे मृतदेह उचलण्याची दुर्देवी वेळ माझ्यावर यावी, यापेक्षा दुसरे दुर्देव कोणते, अशा शब्दात त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करू न दिली. या युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेले नारायणराव साबळे यांच्या माहितीनुसार, ३ ते १६ डिसेंबरदरम्यान झालेल्या युध्दात, तसेच तत्पूर्वी पाकिस्तान व बांगलादेशात उद्भवलेल्या परिस्थितीत १५ लाखापेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या युध्दात भारताचे ३ हजार ८४३ जवान शहीद झाले होते.या युध्दात प्राणाची बाजी लावणार्या मराठा बटालियनमध्ये नारायण साबळे यांचाही सहभाग होता. या बटालियनमधील लान्स नायक नारायण फाळके, यशवंत पवार, लक्ष्मण राणे, प्रभाकर काटकर, गजानन चव्हाण, मनगुटकर, बळवंत पाटील, तयप्पा नरवाडे, पी.एस.पाटील, दत्ता दळवी, मारोती जाधव आणि अशोक यादव यांना या युद्धात विरगती प्राप्त झाली. सैन्यातून परतल्यानंतर साबळे यांनी पोलिस दलात नोकरी केली. पोलिस दलातून सेवानवृत्त झाल्यानंतर, त्यांनी शेतीकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. अंदुरा येथे स्वत:च्या कुटुंबासोबत राहणार्या साबळेंप्रती ग्रामस्थांमध्ये आदराची भावना आहे. *५४ सैनिक आजही बेपत्ता.युध्दसमाप्तीनंतरही भारताचे ५४ जवान आणि अधिकारी आजही बेपत्ता आहेत. भारताचे जवान आपल्या ताब्यात नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. या ५४ सैनिकांच्या कुटुंबांना सरकारकडून नवृत्ती वेतन दिले जात आहे.
भारत- पाक युध्दाचा साक्षीदार अकोल्यात
By admin | Updated: December 16, 2014 01:05 IST