लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या बाबापूर, बेंबळा शिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. बाबापुर येथील शेतकरी सुभाष इंगोले यांच्या शेतातील गहू या पिकाचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले आहे.बाबापूर, बेंबळा शिवारात शेतकºयांनी रब्बी हरभरा व गहू या पिकाची पेरणी केली. परंतु रोही व रानडूकरे या वन्यप्राण्यांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे. मात्र, अद्याप या मागणीकडे वनविभागाने लक्ष दिले नाही. बाबापूर येथील सुभाष इंगोले यांनी २ एकरात गव्हाची पेरणी केली. विहिरीला मूबलक पाणी असल्याने विद्युत पुरवठा नसताना सुध्दा डिझेल इंजिनच्या सहाय्याने सिंचन करून गहू पीक घेतले आहे. रविवारी रानडुकराने या गव्हाचे प्रचंड नुकसान केले आहे. यासह अन्य शेतातील पिकांचेदेखील वन्यप्राण्यांनी नुकसान केले आहे. वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने शेतकºयांची चिंता अधिकच वाढली आहे. वनविभागाने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सुभाष इंगोले यांनी केली.
वन्यप्राण्यांचा हैदोस; पिकांची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 13:50 IST