अकोला : गतवर्षी दुष्काळी मदत म्हणून जाहीर केलेली रक्कम ज्या शेतकर्यांना तांत्रिक अडचणींमुळे मिळू शकली नव्हती, त्यांना ती लवकरच मिळणार आहे. बँक खाते नसल्याने पश्चिम विदर्भातील शेतकर्यांचे ४७ कोटी रूपये शासनाकडे परत पाठविण्यात आले होते. ते शेतकर्यांना देण्याची प्रक्रीया लवकरच सुरू होणार आहे. गतवर्षी पाऊस नसल्याने शेतकर्यांना दुष्काळाचा सामना करावा लागला. या गर्तेतून बाहेर काढण्यासाठी शासनाने मदत जाहीर केली होती. त्यातील ८0 टक्केच्यावर रक्कम पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती व यवतमाळ जिल्हय़ातील शेतकर्यांना मिळाली होती; तथापि शेतकर्यांचे पात्र बँक खाते उपलब्ध झाले नसल्याने मार्च २0१५ मध्ये ४७ कोटी रूपये शासनाकडे परत पाठविण्यात आले होते. शासनाने ही रक्कम पाठविली असून, लवकरच ती शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. जी रक्क म मिळाली त्यामध्ये अमरावती जिल्हय़ाला ८.५0 कोटी रुपये, अकोला जिल्हय़ाला ८.६0 कोटी रुपये, वाशिम जिल्हय़ाला ६.४६ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. बुलडाणा व यवतमाळ जिल्हय़ातील परत गेलेली ही रक्कम शेतकर्यांना प्राप्त झाली आहे. मागील खरीप हंगामात दुष्काळस्थिती निर्माण झाल्याने शेतकर्यांना शासनाने मदत जाहीर केली होती. वाशिम जिल्हय़ाला या अगोदर १११ कोटी मिळाले आहेत. उर्वरित ६ कोटी ४६ लाख रूपये ११ जुलैला मिळाले आहेत. ते शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतील, असे वाशिमचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्पष्ट केले.
पश्चिम विदर्भाला मिळाले ४७ कोटी!
By admin | Updated: July 17, 2015 01:49 IST