सुनील काकडे/वाशिम: नागपूर येथील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत अमरावती जलसंधारण विभागाचे मुख्य अभियंता यांच्या अखत्यारीत येणार्या सर्व कार्यालयांच्या मूळ कार्यप्रकारात बदल करून, मंजूर पदांसह संपूर्ण आस्थापना सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतरित करण्याच्या हालचाली जोरात सुरू आहेत. या बदलामुळे आधी असलेला कर्मचार्यांचा अनुशेष वाढण्याची शक्यता असून, जिल्हास्तरावरील सिंचनाची कामे प्रभावित होत आहेत. यवतमाळ पाटबंधारे मंडळ (यवतमाळ), बुलडाणा पाटबंधारे मंडळ (बुलडाणा), ऊध्र्व वर्धा प्रकल्प मंडळ (अमरावती), अकोला पाटबंधारे मंडळ (अकोला), वाशिम पाटबंधारे मंडळ (वाशिम), पाटबंधारे प्रकल्प व जलसंपत्ती अन्वेषण मंडळ (अमरावती) अंतर्गत येणार्या विभाग व उपविभागीय कार्यालयांना बांधकाम कार्यप्रकारातून सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतरित करणे व मंडळ, विभाग, उपविभाग, शाखा कार्यालयांच्या मूळ नावात व कार्यप्रकारात बदल करण्याच्या हालचाली सध्या जोरात सुरु आहेत. त्यानुसार, सर्व कार्यालयांच्या मंजूर पदांसह संपूर्ण आस्थापना सिंचन व्यवस्थापन कामांकरिता वर्ग करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत; मात्र यासाठी कुठलीही पदे नव्याने निर्माण केली जाणार नाहीत. अस्थायी आस्थापनेवरील पदांकडून समकक्ष वेतनश्रेणीतील पदांची कामे अतिरिक्त कार्यभार देऊन करून घ्यावी, वर्गीकरण झालेली सर्व कार्यालये आहेत त्याच जागी ठेवावीत, त्यासाठी बांधकामाचा खर्च करू नये, सध्या कार्यरत विभाग-उपविभागातील उपलब्ध साहित्यांचाच वापर करावा, प्रशासकीय व आस्थापना खर्चात वाढ होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. अमरावती विभागातील बुलडाणा पाटबंधारे मंडळ, ऊध्र्व वर्धा प्रकल्प मंडळ या कार्यालयाच्या नियंत्रणाखाली व्यवस्थापन आस्थापना सुरू होत असल्याने नवीन संगणक संकेतांक प्राप्त होईस्तोवर मंडळांतर्गत असलेल्या कार्यालयांची वेतनाबाबतची व्यवस्था आहे तीच कायम राहणार आहे.
‘जलसंधारण’च्या कार्यालयांचे सिंचन व्यवस्थापन कार्यप्रकारात रूपांतर!
By admin | Updated: January 12, 2016 01:41 IST