वारीच्या धरणातून २० वर्षांपासून गाळाचा उपसाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 03:03 PM2019-05-25T15:03:13+5:302019-05-25T15:03:18+5:30

दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे.

wan dam in telhara taluka full of water | वारीच्या धरणातून २० वर्षांपासून गाळाचा उपसाच नाही!

वारीच्या धरणातून २० वर्षांपासून गाळाचा उपसाच नाही!

googlenewsNext

- सत्यशील सावरकर 
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : वारी हनुमान सागर धरण हे तालुक्यासह इतरही जिल्ह्यासाठी जलसंजीवनी देणारा प्रकल्प आहे. दरवर्षी शंभर टक्के साठा असलेल्या या धरणातील गाळ गेल्या २० वर्षांपासून काढलाच नसल्याचे चित्र आहे. गाळ न काढल्याने परिसरातील भूजल पातळी वाढली नाही.
वारी हनुमान सागर प्रकल्प तालुक्यातील जनतेला सिंचनासाठी मोठा आधार असलेला प्रकल्प आहे. या पाण्यावर सिंचन करून लाभक्षेत्रातील शेतकरी खरिप व रब्बीत चांगले पिके घेतात. या प्रकल्पातील पाण्यावर विद्युत प्रकल्पसुद्धा चालतो, त्यामुळे परिसरातील जनतेच्या नजरा या धरणातील जलसाठ्याकडे असतात. उन्हाळ्यात सर्वत्र भीषण दुष्काळ पडला आहे. अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. भूजल पातळी प्रचंड खालावली आहे. बहुतांश बोअरवेल कोरडे पडले आहेत. बागायती शेती कोरडवाहू होत आहे. एकूणच परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे, असे असताना वारी येथील हनुमान सागर प्रकल्प हा दोन जिल्ह्यातील लाखो लोकांची तहान भागवित आहे. सोबतच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली असते, त्यामुळे या धरणातील जलसाठ्याकडे सर्वांचे लक्ष असते; परंतु या ठिकाणी भूजल पातळीत सुरुवातीला वाढ दिसली. त्यानंतर परिसरातील भूजल पातळीत वाढ दिसत नसल्याचे दिसत आहे. जेथे मोठे धरण आहे, त्या परिसरात भूजल पातळी चांगली राहते; परंतु वान प्रकल्प वीस वर्षांपासून कार्यरत असून, या परिसरात भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी सतत खालावत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गत वीस वर्षात धरणातून गाळ काढला नसल्याने पाणी मुरण्याच्या प्रमाणात घट होत असल्याने भूजल पातळीत वाढ होताना दिसत नाही. परिणामी, परिसरात बागायती शेती कमी होत आहे. एकीकडे धरणातील गाळ काढण्यासाठी गाळमुक्त धरण, ही महत्त्वाकांक्षी योजना महाराष्ट्र शासनाची असली तरी हनुमान सागर प्रकल्पातील गाळ काढण्याबाबत प्रयत्न होणे गरजेचे आहे.
हनुमान सागर प्रकल्पाचा जलाशय परिसर हा मेळघाट व्याघ्र प्रकल्पात येत असल्याने व गाळ काढण्याकरिता वन विभागाच्या परवानगीची गरज आहे. मागील वर्षी वान प्रकल्प अभियंत्यांनी त्याबाबत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपवन संरक्षकांकडे धरणातील गाळ काढण्याबाबत लेखी पत्राद्वारे परवानगी मागितली होती. विशेष म्हणजे वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पत्राला कोणतेच उत्तर दिले नसल्याचे समजते आणि अजूनपर्यंत परवानगीही दिली नसल्याचे समजते. याबाबत ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी होत आहे.


वान प्रकल्पाच्या सभोवताली व्याघ्र प्रकल्पाची वन जमीन असल्यामुळे या कार्यालयामार्फत आम्ही सुजलाम सुफलाम योजने अंतर्गत वन विभागाला गाळ काढण्याबाबत परवानगी मागितली होती, ती अद्याप मिळालेली नाही.
अ. प्र. गुल्हाने,
सहायक अभियंता श्रेणी-१
वान प्रकल्प, तेल्हारा.


भूजल पातळी खालावत असतानाही शासनाची गाळमुक्त धरण योजना कागदावरच आहे. वीस वर्षांपासून प्रलंबित हनुमान सागर प्रकल्पातील गाळ तत्काळ काढण्यात यावा.
- संतोष बजाज

Web Title: wan dam in telhara taluka full of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.