अकोला: बुलडाणा संघाचा भरवशाचा सलामीचा फलंदाज निखिल भोसले याच्या शानदार शतकी खेळीने बुलडाणा संघाला बलाढय़ भंडारा संघावर ६ गडी राखून विजय मिळविता आला. भंडारा विरुद्ध बुलडाणा जिल्हा संघातील हा सामना अकोला क्रिकेट क्लब मैदानावर शनिवारी खेळण्यात आला.भंडारा संघाने प्रथम फलंदाजी करीत ५0 षटकात ९ बाद १७४ धावसंख्या उभारली. गणेश जोशीच्या ३९ धावांव्यतिरिक्त अन्य फलंदाज खेळपट्टीवर फारशी कामगिरी दाखवू शकले नाहीत. बुलडाणा संघाकडून रामेश्वर सोनोने याने २ गडी बाद केले. सतीश परिहार, संतोष आठवले, ऋषिकेश पवार, निखिल कुळकर्णी यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.प्रत्युत्तरात बुलडाणा संघाने ३७.५ षटकात ४ बाद १७७ धावा काढून सहज विजय मिळविला. सर्वप्रथम फलंदाजीला उतरलेल्या सुशील वानखडे याने केवळ ९ धावा काढल्या. त्याचा जोडीदार निखिल भोसले याने चौकार व षटकारांची आतषबाजी करून नाबाद १0६ धावा काढून, स्पर्धेतील पहिले शानदार शतक झळकाविले. प्रमोद वाघ केवळ ३ धावा काढून माघारी परतला. शुभम पाटीलने १७ धावांचे योगदान दिले. गोपाल निळे याने १ धाव दिली. सामन्यात पंच म्हणून संजय हिंगोलीकर, श्रीकांत बोपळे यांनी काम पाहिले. गुणलेखन नीलेश धापुडकर यांनी केले.दुसरा सामना अरुण दिवेकर क्रीडांगण येथे गडचिरोली व अकोला जिल्हा संघात झाला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या गडचिरोली संघाने ३६ षटकात सर्वबाद ८८ धावा काढल्या. अकोला संघाकडून प्रणव आठवले व अंकुश वाकोडे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. शारिक खान, मयूर बडे, नयन चव्हाण यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. गडचिरोली संघाने दिलेले आव्हान अकोला संघाने अवघ्या ११ षटकात १ गडी गमवित ९२ धावा काढून सहज विजय मिळविला. सचिन थोरात याने नाबाद ५१ धावा काढल्या. प्रणव आठवले याने ३१ धावांचे योगदान दिले. प्रणव परनाटे याने नाबाद १ धाव दिली. गडचिरोलीच्या राजीक खतीब याने प्रणव आठवले याला त्रिफळाचित केले. सामन्यात पंच म्हणून प्रकाश सिंह, कपिल गिरी यांनी काम पाहिले. नीलेश लखाडे याने गुणलेखन केले.
विजय तेलंग स्मृती आंतरजिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याचा ९ गडी राखून विजय
By admin | Updated: November 29, 2014 21:51 IST