प्रवीण खेते /अकोला : चार वर्षांपूर्वी शालेय आरोग्य तपासणीदरम्यान जुने शहरातील महानगरपालिका शाळा क्रमांक १५ मधील वैष्णवीच्या हृदयात छिद्र आढळले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने आई-वडीलदेखील हतबल झाले होते. परंतु, तब्बल चार वर्षांनी पुन्हा तपासणीसाठी आलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. अताउर रहेमान यांनी तिच्या शस्त्रक्रियेचा विडा उचलत जुलै २0१५ मध्ये मुंबई येथे यशस्वी शस्त्रक्रिया घडवून आणली आणि तिच्या आयुष्याची ज्योत पुन्हा उजाळली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत बालकांचे स्वास्थ्य तपासणीसाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. या कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका कार्यक्षेत्रात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत जिल्हा सर्वोपचार रुग्णालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत वैद्यकीय अधिकारी डॉ. अताउर रहेमान हे चार वर्षांपूर्वी म्हणजेच शैक्षणिक सत्र २0१0-११ मध्ये जुने शहरातील शिवनगरस्थित मनपा शाळा क्रमांक १५ मध्ये आरोग्य तपासणीसाठी पोहोचले. तपासणीदरम्यान इयत्ता पहिलीची वैष्णवी संजय वैद्य हिच्या हृदयात छिद्र असल्याचे आढळले. या संदर्भात डॉ. रहेमान यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना कळविले. त्यांनी वैष्णवीच्या पालकांना शाळेत बोलावून वैष्णवीच्या आरोग्याबाबत सविस्तर सांगितले. मात्र, हे सत्य स्वीकारायला वैष्णवीचे आई-वडील तयारच नव्हते. वैष्णवीच्या पालकांना तिच्या प्रकृतीबाबत कसेबसे समजावून सांगितले. परंतु, मोलमजुरी करून पोट भरणारे वैद्य दाम्पत्य शस्त्रक्रियेसाठी पैसा आणणार तरी कुठून? असा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. त्यांची परिस्थिती पाहता, डॉ. रहेमान यांनी वैद्य दाम्पत्याला धीर देत शासकीय मोहिमेंतर्गत शस्त्रक्रियेसाठी आवश्यक दस्तऐवज गोळा करायला सुरुवात केली. वैद्य कुटुंबाचे रेशन कार्डदेखील जीर्णावस्थेत पडलेले होते. त्यांच्या रेशन कार्डचे नूतनीकरण करून डॉ. रहेमान यांनी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मुंबई येथील सुराणा रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी सोय केली. जुलै २0१५ मध्ये वैष्णवीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि तिच्या आयुष्याची ज्योत पुन्हा उजाळली. पहिल्यांदाच बघितले रेल्वे स्टेशन पोटाची खळगी भरण्यासाठी वैद्य दाम्पत्याचा संपूर्ण दिवस मोलमजुरीत जात असल्याने त्यांच्यासाठी इतर गोष्ठी गौणच. अद्यापही रेल्वेचा प्रवास त्यांनी केला नाही. मात्र, वैष्णवीच्या शस्त्रक्रियेसाठी मुंबईला जाण्यासाठी तिचे पालक शाळेच्या शिक्षिकांसोबत रेल्वे स्टेशनवर गेले. तेव्हा वैष्णवीच्या आईने पहिल्यांदाच रेल्वे स्टेशन बघितल्याचे समजले. हे ऐकून शिक्षिकांच्याही डोळ्य़ात पाणी आले.
तब्बल चार वर्षांनी वैष्णवीला मिळाले नवीन आयुष्य
By admin | Updated: November 5, 2015 01:50 IST