बुलडाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकर यांची राज्य शासनाने १0 जुलै रोजी वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. न्यायालयाच्या आदेशामुळे त्यांचे यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्षपद तीन दिवसांपूर्वीच गेले होते. मुंबई येथे सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व स्वाभिमानी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत रविकांत तुपकरांना वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले. १३ मे रोजी यंत्रमाग महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तपुकरांवर देण्यात आली होती. तत्पूर्वी या महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष चंद्रकांत दायमा यांना अध्यक्षपदावरून काढताना कायदेशीर बाबींचे पालन करण्यात आले नव्हते. या मुद्यांवर बोट ठेवून दायमा यांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दायमा यांना दिलासा दिला आणि त्यामुळे तुपकरांच्या अध्यक्षपदावर गंडांतर आले होते. तुपकर यांची नियुक्ती वैध होती; मात्र दायमा यांना हटवितांना नियम पाळल्या गेले नसल्याने तुपकरांसह कार्यकर्त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. या पृष्ठभूमीवर अवघ्या तीन दिवसात तुपकरांना वस्त्रोद्योगसारख्या आणखी एका प्रभावी महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले.
वस्त्रोद्योग महामंडळावर तुपकरांची नियुक्ती
By admin | Updated: July 11, 2015 01:38 IST