मूर्तिजापूर : येथून १८ कि.मी. अंतरावरील ग्राम विराहित हे गाव असून या गावाची लोकसंख्या जवळपास ३ ते ४ हजारांचे वर असून, येथे नवसाला पावणार्या आई तुळजाभवानी यांचे प्रशस्त असे मंदिर संस्थान आहे. हे संस्थान जागृत संस्थान म्हणून प्रचलित आहे. विराहित हे गाव शहरापासून दूर जरी असले तरीही भक्तांची दरवर्षी नवदुर्गा उत्सवादरम्यान प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी होते.मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित येथे भक्तांना जाण्या-येण्यासाठी अकोला व मूर्तिजापूर येथून खासगी व ए.टी. बसेस उपलब्ध आहेत. मंदिराबाहेरील खंडित विविध प्रकारच्या मूर्तींवरून हे सिद्घ होते की, हे मंदिर मुगलकालीन आहे. पूर्वी या ठिकाणी काहीच नव्हते मूर्तिजापूर येथील मनोहरराव किडे यांचे वडिलाचे वडील बाबूजी किडे हे अनेक वर्षांपासून आई तुळजा भवानीची पायदळ वारी करीत होते. त्यांचे वयाचे परिस्थितीमुळे त्यांनी तुळजाभवानीस एकदा वारीदरम्यान आता माझी वारी करण्याची क्षमता नसून, आता माझे तुझ्या दरबारी येणे शक्य होणार नाही, असे त्यांनी देवीला सांगताच आई तुळजाभवानीने साक्षात बाबूजी किडे यांना दर्शन देऊन जरी तुझे येणे शक्य नाही; पण मी तुझ्या सोबत तुझ्या पाठीमागे येईल. तू पाठीमागे वळून पाहणार नाही, असे सांगून आई तुळजाभवानी बाबूजी किडे यांच्या मागे परतीच्या प्रवासाला निघाली. काही अंतर गेल्यावर चुकून बाबुजी किडे यांनी मागे वळून पाहिले ते गाव होते, मूर्तिजापूर तालुक्यातील विराहित. आईने त्याच गावात विराजमान होण्याचा निर्णय घेतला आणि विराहित येथे बाबूजी किडे यांचे हस्ते आई तुळजाभवानीची स्थापना करण्यात आली.पाहता पाहता गावातील आई तुळजाभवानीच्या भक्तांनी काही हेक्टरमध्ये मंदिर बनविले. आता दर नवरात्रीला येथे भक्तांची नऊ दिवस प्रचंड गर्दी असते. गेल्या अनेक वर्षांपासून आजही या मंदिरात अखंड दिवा जळत आहे. विराहित येथून जवळच येणार्या काजळेश्वर, कंझरा, घोटा, पिंजर, वाई, कानडी, पातूर नंदापूर, धानोरा वैद्य येथून भक्त विराहितची पायदळ वारी करतात.
नवसाला पावणारी आई तुळजाभवानी..!
By admin | Updated: September 27, 2014 00:51 IST