अकोला : पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शेतकऱ्याची तूर चोरी करणाऱ्या तीन चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तीनही आरोपी पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून त्यांना गुरुवारी रात्री अटक करून शुक्रवारी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शेलू बुद्रूक येथील एका शेतकऱ्याची १३ क्विंटल तूर चोरी करण्यात आली होती. या प्रकरणी पिंजर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना स्थानिक गुन्हे शाखेने शेलू बुद्रूक येथील रहिवासी लक्ष्मण बळीराम दळवी वय ६२ वर्षे, महेश लक्ष्मण दळवी वय ३० वर्षे दोघेही राहणार पिंजर व मंगेश पुरुषोत्तम हटकर वय २४ वर्षे राहणार शेलू बुद्रूक या तिघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या तीनही चोरट्यांनी १३ क्विंटल तूर चोरी केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्यांना पिंजर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. चोरीतील तूर जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून तूर परत करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली नरेंद्र पद्मने, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, स्वप्नील खेडकर यांनी केली.