अकाेला: पावसाळ्यात धाे-धाे काेसळणारे पाणी जमिनीत मुरविण्याकडे अकाेलेकरांसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत असल्यामुळेच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली आहे. जठारपेठ, मलकापूर, शिवनी, शिवर, खरप पाचपिंपळ आदी भागात २०० फुटांपर्यंत खाेदूनही पाणी सापडत नसल्याची परिस्थिती आहे. जलपुनर्भरणासाठी उदासिन धाेरण पाहता भविष्यात पेट्राेलपेक्षाही पाणी महाग झाल्यास नवल वाटायला नकाे, अशी शक्यता दिसून येत आहे.
शहरवासीयांना महापालिकेच्या जलप्रदाय विभागाकडून तीन दिवसआड पाणीपुरवठा केला जाताे. मागील काही वर्षांपासून मनपाच्यावतीने शहराच्या प्रत्येक भागात सबमर्सिबल पंप, हातपंप खाेदून त्याद्वारे संबंधित परिसरातील नागरिकांना दैनंदिन पाणीपुरवठा केला जाताे. त्यात भरीस नागरिकांकडूनही घराच्या आवारात सबमर्सिबल पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जाताे. धरणात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध असतानाही पदाधिकारी व प्रशासनाकडून दरवर्षी उन्हाळ्यात सबमर्सिबल पंप, हातपंपांचे प्रस्ताव मंजूर केले जात आहेत. यामुळे शहराची चाळण हाेण्याच्या मार्गावर असताना जलपुनर्भरणा सारख्या महत्वाच्या विषयाकडे प्रशासनासह नागरिकांचे दुर्लक्ष हाेत आहे. परिणामी भूजल पातळीत माेठ्या प्रमाणात घसरण हाेत आहे.
शहराला नळाद्वारे किती दिवसाड मिळते पाणी? -०३
शहरातील एकूण बोअरवेल -
शहराची एकूण लोकसंख्या - ५,३५०००
प्रतीमाणसी मिळते पाणी - १०० लिटर
मलकापूरमध्ये सर्वाधिक बोअरवेल, पाणी सर्वात कमी
हद्दवाढ क्षेत्रातील प्रभाग क्रमांक ४ अंतर्गत येणाऱ्या मलकापूर,शिवर,शिवनी भागात सर्वाधिक बाेअरवेल आहेत. यामध्ये २०१ हातपंप, ५० सबमर्सिबल पंप व नउ विहिरी आहेत. या भागात खडकाचे प्रमाण जास्त असल्याने भूगर्भातील जलपातळी खाेल आहे. त्यामुळे परिसरात किमान २०० ते ३०० फुट पेक्षा अधिकच खाेदावे लागते.
जुने शहरात सर्वात जास्त पाणी
जुने शहरातील हरिहरपेठ, बाळापूर राेड, डाबकी राेड, गुलजार पूरा आदी भागात जास्त पाणी उपलब्ध आहे. ३० वर्षांपूर्वी या भागात बाेअरवेल केल्यास अवघ्या १५ फुट अंतरावर पाणी मिळत हाेते. आता किमान १०० फुट खाेल खाेदावे लागते. या भागात पावसाचे पाणी मुरवण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते.
कोणीही यावे बोअरवेल खोदावे !
बाेअरवेल खाेदण्यासाठी भूजल सर्वेक्षण यंत्रणा तसेच मनपा प्रशासनाच्या परवानगीची गरज नसल्याचा गैरफायदा उचलत नागरिक घराच्या अंगणात मनमानीरित्या खाेदकाम करतात. यामुळे बाेअरवेलची संख्या वाढली असून त्याबदल्यात जलपुनर्भरणाची टक्केवारी अत्यल्प असल्याने भूजल पातळी घसरत चालली आहे.
जलपुनर्भरण नावालाच
अतिशय साध्या पध्दतीने जलपुनर्भरण करणे शक्य आहे. पावसाळ्यात सुमारे १ हजार चाैरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या छतावरील पाणी जमिनीत मुरवल्यास तब्बल १ हजार हेक्टर क्षेत्रफळावरील भूगर्भात ८५ सेंटीमीटरने वाढ हाेते. जमिनीचा पाेत कसा आहे, ही बाब लक्षात घ्यावी. नागरिकांनी घर,काॅलनी व प्रभागात हा प्रयाेग दरवर्षी राबवल्यास भविष्यात पाणी टंचाइ भासणार नाही,हे नक्की.
-सुभाष टाले, माजी प्राध्यापक ‘पंदेकृवि’तथा जलतज्ज्ञ
कमी वेळात जास्त पाउस पडत असल्याने पावसाचे पाणी जमिनीत न मुरता वाहून जात आहे. छतावरील पाण्याचे जलपुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. रिचार्ज शाफ्टमुळे भूजल पातळीत वाढ हाेइल, परंतु त्यामुळे जलस्त्राेत दुषित हाेण्याचीच जास्त शक्यता आहे.
-डाॅ.संजय देशमुख भूजलतज्ज्ञ
कोणत्या भागात किती पाणी?
परिसर बोअरवेल्सची संख्या पाणीपातळी किती? (फुटांत) साधारण दररोज मिळणारे पाणी (लिटरमध्ये)
नायगाव २४५ २३० ६५ लिटर
आपातापा राेड २२६ २७० ६५
मलकापूर २५१ २८० ६५
जठारपेठ २४० २९० ६५
भगिरथ वाडी २४१ २७० ६५
चिंतामणी नगर २५८ २३० ६५
शिवर २४६ २९० ६५
खदान २३८ २८० ६५
साेनटक्के प्लाॅट २३२ २७० ६५
हिंगणा बु. २१५ २६० ६५