"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात समाजाला बदलण्याची ताकद"

By संतोष येलकर | Published: February 25, 2024 03:23 PM2024-02-25T15:23:19+5:302024-02-25T15:24:25+5:30

राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे उद्घाटन

"The power to change the society in Rashtrasant Tukdoji Maharaj's literature", Dnyaneshwar Rakshak | "राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात समाजाला बदलण्याची ताकद"

"राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्यात समाजाला बदलण्याची ताकद"

अकोला : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता आणि त्यांच्या साहित्यात समाजाला बदलण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन नागपूर येथील राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक तथा दहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर रक्षक यांनी शनिवारी सायंकाळी येथे केले. राष्ट्रसंत सेवा समिती व राष्ट्रसंत विचार साहित्य संमेलन आयोजन समितीच्या वतीने अकोला शहरातील रिंग रोडस्थित जानोरकर मंगल कार्यालय येथे आयोजित दहाव्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांच्या हस्ते दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी स्वागताध्यक्ष कपिल ढोके, डाॅ. ममता इंगोले, गुणवंत जानोरकर, डाॅ. गजानन नारे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर, अरविंद तिडके, अरविंद देठे, गाेवर्धन खवले, डाॅ. मानकर, सुधा जंजाळ, डाॅ. रामेश्वर बरगट, ॲड. संतोष भोरे, गजानन झटाले, विवेक पारसकर, पंकज जायले, आदी प्रबोधन विचारपीठावर उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हयातीतच त्यांचे साहित्य जनसामान्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले, असे सांगत ज्या गावात एसटी पोहोचली त्या गावात ‘ग्रामगीता ’ पोहोचली नाही, हे दु:ख असल्याचे रक्षक म्हणाले. भगवी टोपी घालणे म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मानतो, असे नसून राष्ट्रसंतांचे विचार प्रत्यक्ष जीवनात उतरवले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. अकोल्यात होणारे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज साहित्य संमेलन आता जिल्ह्यातील तालुक्यापर्यंत पोहोचले पाहिजे, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. रामेश्वर बरगट यांनी केले. संचालन सचिन माहोकार यांनी, तर आभारप्रदर्शन शेखर साबळे यांनी केले. सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाच्या उद्घाटन सत्राचा समारोप करण्यात आला.

संमेलनातून साहित्याचा प्रचार करण्याचा संकल्प करा : आचार्य वेरुळकर गुरुजी

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनातून राष्ट्रसंतांच्या साहित्याचा प्रचार करण्याचा संकल्प करून संमेलन कृतीत उतरवले पाहिजे, असे प्रतिपादन संमेलनाचे मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी यांनी उद्घाटनपर भाषणात केले. सभा आणि संमेलन यामधील फरक स्पष्ट करीत, जे साहित्य लोकांना अंधश्रद्धेतून बाहेर काढते, विचार करण्यासाठी प्रवृत्त करते, ते खरे साहित्य असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: "The power to change the society in Rashtrasant Tukdoji Maharaj's literature", Dnyaneshwar Rakshak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.