आगग्रस्त दुकानांची पाहणी
अकाेला: जुना भाजी बाजार, चुडा बाजारातील चार दुकानांना मंगळवारी आग लागल्याची घटना घडली. यावेळी भाजपचे आमदार गाेवर्धन शर्मा यांनी आगग्रस्त दुकानांची पाहणी करून झालेल्या नुकसान भरपाईची माहिती घेतली. यावेळी सभापती संजय बडोणे, नगरसेवक अजय शर्मा, हिरालाल कृपलानी, विनोद मनवाणी, दीप मनवानी, अतुल शर्मा, मनीष बाछुका आदी उपस्थित हाेते.
जि.प.मध्ये अधिकाऱ्यांची वानवा !
अकाेला: जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विविध कामांसाठी जिल्हा परिषदेत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना संबंधित अधिकारी जागेवर सापडत नसल्याचे चित्र समाेर आले आहे. नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे प्रलंबित विषय कायम राहत आहेत. दालनातील पदाधिकारीही याेग्यरीत्या समाधान करीत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हा कचेरीत पार्किंगला खाे!
अकाेला: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची वाहने ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे, परंतु पार्किंगचा कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराकडूनच नियमांना बगल दिली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या परिसरात वाहने ठेवताना शिस्तीचे पालन हाेत नसल्याचे चित्र आहे.
महामार्गाची दुरुस्ती रखडली!
अकाेला : शिवनी ते नेहरू पार्क चाैक ते खदान पाेलीस ठाणे ते बाबासाहेब धाबेकर फार्महाउसपर्यंत निर्माणाधीन मिनी हायवेच्या कामाची गती मंदावली आहे. सिमेंट रस्त्याचे रुंदीकरण हाेत असताना, वाशिम बायपास चाैक,गुरांचा बाजार, मानव शाेरूम, तसेच निमवाडी चाैकात रस्त्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे.
जलवाहिनीची दुरुस्ती
अकाेला: जुने शहरातील डाबकी राेड भागात कामगार कल्याण मंडळ कार्यालयाजवळ पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याचे समाेर आले हाेते. या ठिकाणी सातत्याने जलवाहिनीला गळती लागत असल्याचे दिसून येते. मनपाच्या वतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.
शहरात डासांची पैदास
अकाेला : शहरात ठिकठिकाणी सांडपाण्याची समस्या निर्माण झाली आहे. यामुळे डासांची पैदास वाढली असून, प्रभागांमध्ये धुरळणी, फवारणी करण्याची जबाबदारी असलेला महापालिकेचा हिवताप विभाग गाढ झाेपेत असल्याचे समाेर आले आहे. या विभागाकडून नेमक्या काेणत्या प्रभागात फवारणी केली जाते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बाजारपेठेत नियम पायदळी
अकाेला : शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला असतानाही लग्नसराईमुळे विविध साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. यावेळी दुकानांमध्ये काेणत्याही नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र असून, यामुळेच काेराेनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.