अकोला: अनेक वर्षांपासून आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांकडून शिक्षण विभागाकडून आॅनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. २८ एप्रिलपासून शिक्षकांची आॅनलाइन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेकडो शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यामध्ये अनेक जिल्ह्यातून बदलीवर आलेल्या शिक्षकांना स्वगृही परतण्याचे वेध लागलेले आहेत; परंतु काही वर्षांपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील शिक्षकांना बदली करता येत नव्हती. अनेकदा प्रयत्न करूनही त्यांच्या पदरी अपयशच येत होते. शिक्षक संघटनांनीसुद्धा आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यासाठी अनेकदा आंदोलने केली; परंतु शाळांमध्ये रिक्त नसल्याचे कारण पुढे करून शिक्षकांना बदली नाकारण्यात येत होती. पती, पत्नी एकत्रीकरणाच्या निर्णयानुसार पती, पत्नी शिक्षक एकाच जिल्ह्यात असावे. त्यासाठी अनेक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले होते; परंतु त्यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले होते. पत्नी जिल्ह्याबाहेरील शाळेत नोकरीला तर पती शिक्षक अकोला जिल्ह्यात, अशी परिस्थिती अनेक शिक्षकांची आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून शिक्षक, शिक्षिका आंतरजिल्हा बदलीसाठी शासनदरबारी, मंत्रालयात उंबरठे झिजवित होते; परंतु हे प्रयत्न अपुरे पडत होते. आता आंतरजिल्हा बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी शिक्षण विभागाकडून २८ एप्रिलपासून आॅनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याची शक्यता आहे. शासनाने आंतरजिल्हा बदलीसाठी राज्यस्तरीय सेवा ज्येष्ठतेचा निकष लावला असून, डिसेंबरपर्यंत ज्या शिक्षकांनी जिल्हा परिषदेकडून एनओसी घेतली असेल, त्या बाद ठरणार आहेत. अशा शिक्षकांना आता बदलीसाठी नव्याने आॅनलाइन अर्ज करावे लागणार आहे. २८ एप्रिलपासून किंवा मेच्या पहिल्या आठवड्यापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
बदलीसाठी शिक्षकांकडून आॅनलाइन अर्ज मागविणार!
By admin | Updated: April 26, 2017 01:46 IST