सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पदनिर्मितीची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 12:58 PM2019-06-03T12:58:38+5:302019-06-03T12:58:48+5:30

सर्वसामान्य रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 Super Specialty Hospital Waiting for post recruting | सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पदनिर्मितीची प्रतीक्षा!

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला पदनिर्मितीची प्रतीक्षा!

Next

- प्रवीण खेते
अकोला : जवळपास साडेतीन वर्षांपूर्वी अकोल्यासह लातूर, यवतमाळ आणि औरंगाबाद या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बांधकामास सुरुवात झाली. राज्यातील हे चारही रुग्णालये २०१८ च्या अखेरीस रुग्णसेवेत सुरू होणे अपेक्षित होते; परंतु अद्याप रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक पदनिर्मितीच करण्यात आली नाही. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना सुपर स्पेशालिटी रुग्णालयाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यात अकोल्यासह लातूर, यवतमाळ आणि औरंगाबादसारख्या शहरांसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ही मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक बळकट होऊन, स्थानिक पातळीवरच रुग्णांना आवश्यक सर्व सुविधा मिळणे सोयीस्कर होणार आहे. शासनाने चारही जिल्ह्यांत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी देत तीन वर्षांच्या कालावधीत इमारत बांधकाम व त्यानंतर लगेच रुग्णसेवा सुरू करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार चारही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम ८० ते ९० टक्के पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत हे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते; परंतु ते अद्याप पूर्ण झाले नाही. यातच शासनातर्फे अद्यापही सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी पदनिर्मितीच केली नाही. इमारत पूर्णत्वास येत असली तरी पदनिर्मितीअभावी प्रत्यक्ष रुग्णसेवेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वैद्यकीय साहित्य येण्यास सुरुवात
मागील चार महिन्यांपासून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य येण्यास सुरुवात झाली आहे; परंतु हे साहित्य स्वीकारण्यासाठी अधिकृत अधिकारी नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांनाच हे साहित्य स्वीकारण्याची जबाबदारी सांभाळावी लागत आहे.


सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले असून, वैद्यकीय साहित्यदेखील येत आहे; परंतु अद्याप पदनिर्मिती झालेली नाही. हीच स्थिती राज्यात लातूर, यवतमाळ आणि औरंगाबाद येथील सुपर स्पेशालिटीच्या बाबतीत आहे.
- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

Web Title:  Super Specialty Hospital Waiting for post recruting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.