कोरोना नियमांचे हाेतेय उल्लंघन
अकोला : दुपारी ४ पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. दुकानांसमाेर हाेणारी गर्दी पाहता काेराेनाचा धाेका वाढला आहे. नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे दिसून येत आहे.
भंगार बसमुळे प्रवासी त्रस्त
अकोला : आगारातील भंगार बसेसमुळे प्रवासी चांगलेच त्रस्त झाले आहेत. अनेकदा बसमध्ये बिघाड किंवा टायर पंक्चर झाल्यास टुल्स किट नसल्यामुळे प्रवासी ताटकळत बसतात. बसमधील आसने व खिडक्या निखळल्या आहेत.
प्रदूषणावर आळा घालण्याची मागणी
अकोला : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण असल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे या प्रदूषणाच्या समस्येवर लवकरात लवकर आळा घालण्याची मागणी होत आहे.
पशू योजनांबाबत जनजागृती आवश्यक
अकोला : पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पशुपालकांसाठी विविध योजना राबविल्या जातात; मात्र बहुतांश पशुपालकांना या योजनांची माहिती नसल्याने ते या योजनांचा लाभ घेऊ शकत नाही. पशुसंवर्धन विभागाने या योजनांची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याची गरज आहे.
कुंपणअभावी शेतीचे जनावरांकडून नुकसान
अकोला : प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने तार कुंपणाचा पुरवठा केला जातो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना या तारांचा पुरवठा करण्याची मागणी होत आहे. शेतपिकांच्या संरक्षणासाठी सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांना काटेरी तार पुरविण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
नेटवर्कअभावी ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा
अकोला : जिल्ह्यातील शाळा या विद्यार्थीविरहित सुरू झालेल्या आहेत. सध्या तरी शाळा, महाविद्यालये प्रत्यक्ष सुरू होतील असे चिन्ह दिसत नाही. त्यासाठी काही माध्यमिक, प्राथमिक शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचे वर्ग सुरू केले आहेत; मात्र कधी नेटवर्क नाही, तर कधी शिक्षकांचा आवाज येत नसल्याने या ऑनलाइन शिक्षणाचा खेळखंडोबा होताना दिसून येत आहे.
पीकविम्याची प्रतीक्षा
अकोला : पेरणीचे दिवस निघून जात असताना अनेक शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही. विम्याचे पैसे अडचणीत कामी येईल, अशी अपेक्षा त्यांना होती; परंतु विमा कंपनीच्या धोरणाचा फटका या शेतकऱ्यांना बसत आहे.