गाडीची स्पीड आणि लोकेशनही कळणार!
अकोला बसस्थानकामध्ये चार मोठे डिजिटल स्क्रिन लावले आहे. यावर प्रवाशांना लाईव्ह लोकेशन दिसणार आहे.
गाडी रफ चालविणे, विनाकारण थांबणे टळणार आहे. यामुळे गाड्या वेळेवर बसस्थानकात येतील.
गाडीचे ब्रेक डाऊन झाले असेल, टायर पंक्चर झाले असेल याबाबतची माहिती या सिस्टिममुळे कळते.
बसस्थानकात लागले चार मोठे स्क्रिन
व्हीटीएसचे शहरातील बसस्थानकात ४ मोठे स्क्रिन लागले असून प्रवाशांना येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीची माहिती मिळत आहे.
थांबा नसताना थांबा घेतला, गाडी रफ चालविली, विनाकारण ब्रेक लावला, या सर्व बाबी या सिस्टिममुळे स्क्रिनवर दिसतील. शिवाय, या संबंधाची वॉर्निंग बेलही दिली जाते.
रोजच्या रोज गाडीचे बुकिंग या सिस्टिममध्ये केले जाते. त्यात गाडीचा नंबर टाकला जातो. ड्रायव्हर, चालकाची माहिती त्यात असते. गाडी स्थानकातून सुटल्यापासून ती परत येईपर्यंत तिच्यावर नियंत्रण या सिस्टिमचे राहते.
चालकांच्या निष्काळजीपणाला बसणार चाप
प्रवासी नसताना किंवा थांबा नसताना आता चालक, वाहकांना कोठेही गाडी थांबविता येणार नाही. कारण गाडी थांबल्याबरोबर थेट डेपोमध्ये आणि बसस्थानकात त्याची माहिती कळणार आहे.
आगार व्यवस्थापकाकडे त्याचा खुलासा चालक-वाहकाला करावा लागेल. त्यामुळे निर्धारित वेळ चालक-वाहकांना पाळावी लागेल.
प्रवाशांनाही आता गाडीची तासनतास वाट पाहण्याची गरज लागणार नाही. किती वेळात गाडी पोहोचेल याची इत्यंभूत वेळ या सिस्टिमव्दारे कळणार आहे.
विभागातील ३६५ बसेसना व्हीटीएस
व्हीटीएस सिस्टिममुळे बसस्थानकात किती वेळात गाडी येऊ शकते, याचा अंदाज बांधता येणार आहे. अकोला विभागातील ३६५ बसेसमध्ये ही सिस्टिम बसविण्यात आली आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अकोला बसस्थानकात ही सिस्टीम कार्यान्वित झालेली नाही.