अकोला: संसर्गजन्य कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मनपा प्रशासनाने अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीसाठी ३०७ द्विसदस्यीय पथकांचे गठन केले होते. यामुळे मनपाचा प्रशासकीय कारभार विस्कळीत झाल्याची बाब लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी पथकांमधील कर्मचाऱ्यांच्या पुन्हा मनपात नियुक्त्या केल्या आहेत. त्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीचा भार पुन्हा एकदा मनपाच्या शिक्षकांवर सोपविण्यात आला आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून शहरात पुन्हा एकदा संसर्गजन्य कोरोना विषाणूने हात-पाय पसरल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील खासगी रुग्णालये तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना उपचार करण्यासाठी खाटांची कमतरता असल्याची बाब नुकतीच समोर आली आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनपा प्रशासनाने अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ३०७ पथकांचे गठन केले होते. एका पथकामध्ये दोन कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या पथकांनी घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी मोहिमेला सुरुवातही केली होती. त्यांच्या दिमतीला मनपाचे शिक्षक तसेच आशा वर्कर होत्या. यादरम्यान, मनपाची यंत्रणा आरोग्य तपासणीमध्ये व्यस्त असण्याचा परिणाम प्रशासकीय कारभारावर झाल्याचे दिसून आले होते. ही बाब मनपा आयुक्त निमा अरोरा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विविध विभागातील कर्मचाऱ्यांना माघारी बोलावले आहे. त्यामुळे अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारी पुन्हा एकदा महापालिकेच्या शिक्षकांसह आशा वर्कर यांच्यावर आली आहे.
शिक्षक, वसुली निरीक्षक लागले कामाला!
शहरातील मालमत्तांची इत्थंभूत माहिती मालमत्ता कर विभागातील वसुली निरीक्षकांकडे आहे. वसुली निरीक्षकांच्या माध्यमातून अशा मालमत्तांची यादी शिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे. भरउन्हात नागरिकांच्या घरी जाऊन आरोग्याची माहिती जमा केली जात आहे.
शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम प्रभावित
मनपा शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढावी तसेच बालकांना शिक्षणाचा हक्क मिळावा या उद्देशातून मनपाच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण राबविले जाते. यंदा ही मोहीम शिक्षण विभागाने सुरू केली असता या दरम्यान अकोलेकरांच्या आरोग्य तपासणीची जबाबदारीही शिक्षकांवर येऊन ठेपली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शोध मोहिमेला आडकाठी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.