राहुल सोनोने
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील दधम येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळेतील नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिटने वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी पुढाकार घेत दधम फाटा ते गावालगतच्या पडीक जमिनीत तब्बल १००१ बियांचे बीजारोपण केले. यावेळी स्काऊट युनिटच्या सदस्यांनी वृक्षांचे जतन करण्याची शपथ घेतली.
दधम फाटा-गावालगत रस्त्याच्या दुतर्फा परिसरात कडुनिंब, आंबा, चिंच, बोर, जांभूळ, टिकोमा या वनस्पतींच्या बियांवर नैसर्गिक प्रक्रिया करून पडीक जमिनीवरील काटेरी झाडांच्या बुंध्याजवळ प्रत्येकी पाच ते सहा बियांचे रोपण केले. अशा पद्धतीने बीजारोपण केल्यास झाडाची रोपे तयार करावी लागत नसल्याचे युनिटचे म्हणणे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने बियांची ऊगवण झाली, की झाडांच्या बुंध्याजवळ नैसर्गिक ओल राहते. त्यामुळे झाड नष्ट होण्याचे प्रमाण कमी असते. झाडाचे संरक्षण सुद्धा होते. (फोटो)
------------------------------------------------------------
कोरोनाकाळात समजले प्राणवायूचे महत्त्व
कोरोनाच्या संकट काळात प्राणवायूचे महत्त्व नागरिकांना कळले आहे. मानवाच्या सततच्या हस्तक्षेपामुळे नष्ट होत चाललेली जंगल व झाडे किती उपयोगाची आहेत, याचा अनुभव आला आहे. कोरोनाच्या संकट कळात प्राण वायूची कमतरता भासत होती, त्यामुळे वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस स्काऊट युनिटच्यावतीने करण्यात आले.
----------------------------
बीजारोपणासाठी यांनी घेतला पुढाकार
बीजारोपणासाठी मु. अ. प्रल्हाद हाडोळे, मोहम्मद अली, मनोज चव्हाण, युनिट लीडर दत्तात्रय सोनोने, स्काऊट सुमेध सुखाने, विशाल लेकुरवाळे, ओम जाधव, तेजस आडे, योगेश खुळे, रोशन खुळे, मयूर खुळे यांनी सहभाग घेतला. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आले.