अकोला: जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चवथ्या दिवशी शुक्रवारी जिल्हयातील चार तालुक्यांत पंचायत समित्यांच्या गणांतून सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या १४ आणि सात पंचायत समित्यांच्या २८ रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया २९ जूनपासून सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चवथ्या दिवशी २ जुलै रोजी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये पंचायत समिती गणांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यात २, मूर्तिजापूर तालुक्यात १, अकोला तालुक्यात २ व पातूर तालुक्यात १ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या १४ गटांपैकी मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी गटातून १ जुलै रोजी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. जिल्हा परिषद व जिल्हयातील पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत आहे.
उमेदवारी दाखल करण्यासाठी
आज व सोमवारी होणार गर्दी!
रविवार सुट्टीचा दिवस वगळता, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शनिवार व सोमवार असे दोनच दिवस उरले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता शनिवार ३ जुलै व सोमवार ५ जुलै रोजी उमेदवारांची गर्दी होणार आहे.